महाराष्ट्रातला शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता - जयंत पाटील
- Navnath Yewale
- Apr 13
- 1 min read

बेभरवाशी निसर्ग, शेतीमालाचे पडलेले भाव, कर्जाचा वाढता डोंगर आणि संसारगाडा चालविण्याच्या विवंचनेत शेतकरी आत्महत्यांचे सत्रच सुरू आहे. 2014 पासून गेल्या बारा वर्षात जिल्ह्यात तब्बल 1 हजार 573 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. शासनाकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना मतद म्हणून एक लाखाचा धनादेश देऊन तोंडाला पाने पुसण्यात येतात; परंतु या कुटंबाची कधीही भरून न येणारी हानी या तुटपुंज्या मदतीत कशी भरून निघणार.
त्यातच गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून तर आत्महत्याग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाने छदामही दिला नाही, हे वास्तव आहे. याच सार्या घटनांवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.
जयंत पाटील ट्विट करून म्हणाले, नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हरिदास बोंबले यांनी कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. तर गव्हाचे बियाणे बोगस निघाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकर्याने रोटावेटर फिरवून उभे पिक जमीनदोस्त केले.
महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता. ही काय परिस्थिती निर्माण केली आहे? शेती साहित्य खरेदी करताना शेतकर्याला महागाईची झळ बसते, त्याला जीएसटीचा भुर्दंड भरावा लागतो. खताच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. कर्जमाफी तर सत्ताधार्यांच्या शब्दांची वाफ आहे. हे शेतकर्याने ओळखले आहे. सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच, पण सरकारच्या असंवेदनशीलतेने त्याला हतबल बनवले आहे. हे चित्र अत्यंत करुण आहे. आपल्या अन्नदात्याच्या घामाचे मोल काय?
एका बाजूल श्रीमंत धनदांडग्या लोकांसाठी सरकार खैरात वाटत सुटले आहे. तर दसरीकडे अनेक शेतकरी कुटुंब एक-दोन लाखांच्या कर्जापायी घरचा आधार गमावत आहेत. शेतकरी स्व.हरिदास बोंबले यांच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच पाहिजे तसेच सरकाने बोगस बियाणे विक्री करणार्या कंपनीवर तत्काळ फौजदारी खटला दाखल केला पाहिजे, शेतकर्याला नुकसानीचा परतावा कंपनीकडून मिळाला पाहिजे, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली.
Comments