top of page

महाराष्ट्रात उन्हाचा कहर!: महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी? मृत्यूमध्ये एका बाळाचाही समावेश

Apr 27
2 min read

राज्यात गेल्या दोन महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवत आहे. भर दुपारी तर अनेकजण उन्हाने होरपळून निघत आहेत. घसा कोरडा पडत असून अनेकजण चक्कर येऊन पडताना दिसत आहेत. राज्यात गेल्या महिनाभरात उष्माघाताचे 8 बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला सापडला, कुणाची डेडबॉडी ऑटोत तर कुणाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आहे. उष्माघाताने बळी गेलेल्यांमध्ये एका बाळाचाही समावेश आहे.


लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात असलेल्या एरंडी या ठिकाणी उष्माघाताने काल एका युवकाचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करून घरी परतल्यानंतर महेश इंगोले हा युवक चक्कर येऊन कोसळला. त्याला दवाखान्यात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. उष्माघातामुळेच महेशचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला आहेे.


लातूर जिल्ह्यात उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे. निलंगा तालुक्याच्या औराद शाहजानी परिसरात तीव्र उष्णता सातत्याने वाढत असून याच तीव्र उष्णतेने एका शेतकर्‍याचा बळी घेतला आहे. 26 एप्रिल रोजी या शेतकर्‍याचा मृत्यू झाला 60 वर्षीय लक्ष्मण दादाराव भंडारे शेतात काम करत असताना कोसळले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


परभणीत 25 एप्रिल रोजी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिकहून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. परभणीच्या नांदखेडा रोड भागातील ही घटना आहे. शिवाजी बबन कांबळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेनंतर भावाच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उष्माघाताने बाळाचा मृत्यू : लातूर जिल्ह्यातल्या गोंद्री येथे दि.25 एप्रिल रोजी उष्माघाताने नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उष्माघाताची जिल्ह्यातली ही दुसरी घटना आहे. औरादद शहाजनी येथेही उष्माघाताने वृद्ध शेतकरी लक्ष्मण भंडारे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिया गोरे असं गोंद्री गावात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या बाळाचे नाव आहे. कडाक्याचे ऊन आणि उष्ण हवामान याचा थेट परिणाम शरीरावर होत आहे.


शिक्षिकेचा मृत्यू: आहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात उष्माघताचा आणखी एक बळी गेला आहे. दि.23 एप्रिल रोजी गारगुंडी येथील प्राथमिक शिक्षिका उषा फपाळे (वय 50) योच निधन झाले. प्रखर उन्हात प्रवास केल्यानंतर फपाळे यांची प्रकृती बिघाडली. त्यामुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी नेत असतनाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालावली. फपाळे यांची प्रकृती उष्माघातामुळेच खालावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढवळपुरी पाठोपाठ तालुक्यातील ही दुसरी घटना आहे.

रस्त्यावरच आढळला मृतदेह: अमरावती जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजळ दि.19 एप्रिल रोजी एक मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली आहे. 65 वर्षाच्या या व्यक्तीचं नाव किशोर वासनिक असून त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. दि.19 एप्रिल रोजी अमरावतीचं तापमान 44 अंशाच्या पार गेलं होतं. उन्हाचा फटका बसल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असं सांगितलं जात आहे. या रस्त्यावर वाहनाची वर्दळ असताना हा मृतदेह दिसून आला होता.


बसस्थानक परिसरात मृतदेह : हिंगोली बसस्थानक परिसरात 15 एप्रिल रोजी एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. दरम्यान, उष्माघातानेच या व्यक्तीचा मृतदेहा झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. बुधवारी (दि.15 एप्रिल) हिंगोली जिल्ह्याचे तापमान 40 डिग्री सेल्सिअस इतके होते. त्याचाच फटका या व्यक्तीला बसला असावा असं सांगितलं जात आहे.

मालवाहू वाहनात अढळला मृतदेह : अकोला शहरातील जुने शहर पोलीस ठाणे हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. 15 एप्रिलची ही घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीच्या जखमा नव्हत्या. कइदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा कयास पोलिसांनी लावला आहे.

Comments


bottom of page