top of page

मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री नितेश राणेंचे कान टोचले !



राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राजकीय पक्षांनी वर्चस्वासाठी कंबर कसली आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फायरी झडत असताना एकत्रीकरण, युतीच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघाले आहे. तर दूसरीकडे पक्षातील आक्रमक नेते टिकेला प्रत्यूत्तर देण्यास कसलीही कसर सोडताना दिसत नाहीत. त्यातच भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या एका वक्तव्यावरुन महायुतीतील मतभेद समोर आले आहेत. मंत्री नितेश राणे यांच्या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची कान उघडणी केली आहे.


धाराशिव येथे मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करताना “राज्यात भाजपाचे सरकार आहे, देशात नरेंद्र मोदीजी भाजपाचे पंतप्रधान आहेत. पण राज्यात सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, उगाच डिपीसीची यादी रद्द होत नसती” असे म्हटले होते. दरम्यान, विरोधकांना डिवचण्याच्या नादात नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा सगळ्यांचा बाप म्हणून उल्लेख केल्याने महायुतीतील घटक पक्षांनाही एक प्रकारे लक्ष केले. पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना नितेश राणे यांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला.


यावर, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे, त्यामुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी स्वत: याबाबत मला सांगितले की माझ्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता. त्यावर मी त्यांना सांगितले की तुमच्या मनात काहीही अर्थ असला तरी राजकारणात लोकांमध्ये त्या वक्तव्याचा काय अर्थ जातो, ते अधिक महत्वाचे असते. त्यामुळे कोणत्याही नेत्याने अशा प्रकारे बोलणे योग्य नाही. ही बाब त्यांनी मान्य केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र येण्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, याववर ते एकत्रीत येणार की नाही? हे मी सांगू शकत नाही. त्यांच्या मनात शिरुन ते जाणून घेऊन तुमच्यापुढे ठेवण्याची माझ्याकडे शक्ती नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागावला. तसेच जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सर्व जाबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती शरद पवार यांना केली. याबाबतही मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.


यावर, जयंत पाटील यांच्या मनात मला शिरावे लागेल. सगळ्या जबाबदार्‍यातून मुक्त करा म्हणाले, ते जबाबदारीतून मुक्त करणार हे माहिती असल्यामुळे म्हणाले की, त्यांच्या मनात दुसरे काही आहे, हे समजून घ्यावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटात असलेले बंधू निलेश राणे यांनी एक्सवर एक पोस्ट करत नितेश राणे यांना सूचक सल्ला दिला. नितेश ने जपून बोलावे.. मी भेटल्यावर बोलेनच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचे भान ठेवून बोलले पाहिजे. सभेत बोलणे सोपे आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतोय याचे भान असले पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालाणार नाही असे निलेश राणे यांनी म्हटले होते. यावर नितेश राणे यांनी ट्विट करत आपण टॅक्स फ्री आहात असे प्रत्यूत्तर दिल्याने चर्चांना उधान आले.

Comments


bottom of page