top of page

यवतमाळ, अहिल्यानगरमध्ये एटीएसचे एकाच वेळी छापे सशयितांची कसून चौकशी, मोबईल फोन, कागदपत्रे आक्षेपार्हसाहित्य ताब्यात

Feb 15
1 min read

मुुंबई: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी एकाचवेळी मोठ्या प्रमाणात शोधमोहिम राबवल्याने खळबळ उडाली आहे. दहशतवादी कारवायांशी संबंधित गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन्ही जिल्ह्यांतील 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.


कारवाईदरम्यान एक डझनहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


राज्यातील काही तरुणांच्या कट्टरतावादासंदर्भातील विशिष्ट माहितीच्या आधारे, एटीएसने जिल्हा पोलिसांच्या मदतीने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद व उमरखेड शहरांमध्ये शोधमोहीम सुरू केली.


संशयितांशी संबधित घरे, कार्यालये व इतर ठिकाणांसह एकूण 14 ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

शोधमोहिमेदरम्यान काही गुन्हेगारी स्वरुपाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सध्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून अद्याप कोणालाही औपचारिक अटक करण्यात आलेली नसल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील सात ठिकाणीही अशाच स्वरुपाचे छापे टाकण्यात आले. येथेही संशयितांकडून काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले असून चौकशी सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई अद्यापही सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

Comments


bottom of page