राजा कायम राहील पण..., यंदाही महापूर..; देशाची संरक्षस्थिती तणावात! भेंडवळ घटमांडणीच्या भाकिताचे निष्कर्ष समोर
- Navnath Yewale
- Apr 20
- 2 min read

बुलढाण्यामधील भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज आज जाहीर करण्यात आला सुमारे 370 वर्षापासूनची असलेल्या भेडवळच्या घट मांडण्याची परंपरा आजही कायम आहे. काल अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर सुर्यास्तच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सुर्यादयावेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी पाऊस राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले.
घट मांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान हे त्यांच्या खुर्चीवर कायम राहतील मात्र ते तणावात राहतील. तर देशाची संरक्षण स्थिती ही कमकुवत राहील संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीतून समोर आला आहे. शेतकर्यांसाठी यंदा पुन्हा अडचणीचं वर्ष ठरू शकते. यंदा सर्व पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असल्याचा निष्कर्ष यातून निघाला आहे. मात्र कापूस, तीळ अशा प्रकारची पीक भरपूर होतील व त्यांना भावही मिळेल असाही निष्कर्ष भेंडवळच्या घट मांडणीतून निघाला आहे.
यंदाचे निष्कर्ष : पिकांवर रोगराईचं प्रमाण जास्त असेल., कापुस,तांदुळ पिकाचे उत्पन्न भरपूर., ज्वारी, तूर, मुग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील., तीळ, बाजरी हे पीक भरपूर असेल., देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल, राजा कायम असेल., देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही., पाऊस जूनमध्ये भरपूर जूलै सर्वसाधारण , ऑगस्ट, सप्टेंबर की असेल., अनेक भागत महापुरामुळे नुकसान होणार
अशी केली जाते घटमांडणी:
घटामध्ये रात्रभर होणार्यसा नैसर्गिक बदलाचे पहाटे सुक्ष्म निरीक्षण केले जाते. हजारो शेतकर्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गीक संकटाबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तवण्यात येते. या भविष्यवाणीवर शेतकर्यांचा अतुट विश्वास आहे. या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पिकपाण्याचे नियोजन करत असतात. मातीच्या ढेकळावरुन चार महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. विविध धान्यांवरुन आगामी हंगामातील पिके कसे राहतील, हे सांगण्यात येते. चारा-पाणीसाठी सांडाइ, कुरडई, तर पुरी निसर्गाशी संबधीत राहते. करंजीवरुन देशाची आर्थिक परिस्थिती सांगण्यात येते. भादली हे रोगराईचे तर पान-विडा राजाच्या गदीचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. राजा म्हणजे पंतप्रधान. पान विड्यात होणार्या बदलावरुन भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले जाते. मसूर हे पीक परकीय घुसखोरीचे द्योतक आहे.
शेतकर्यांचा विश्वास : घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात, या परिसरात हजारोंच्या संख्येने शेतकरी एकत्रित जमतात. शेतकरीच नव्हे तर बी-बीयाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकर्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात. शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची, हे ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पिक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येत असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे.
दरम्यान, घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय अधार नसला, तरी आजही परंपरेने बळीराजाच्या मनातील महत्व कमी झालेलं नाही. भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून याच भविष्याविषयी शेतकर्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक-पाणी, राजकीय, आर्थिक भाकितं बर्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती निव्वळ ठोकताळे म्हणत असेल, तरी शेतकर्यांचा भेंडवळच्या घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.
भेडवळची घट मांडणी, ही बुलढाण्यातील भेंडवळ गावातील स्थानिक परंपरा आहे. त्यातून ते पावसाचा अंदाज वर्तवतात असा त्यांचा दावा आहे. स्थानिकांचा त्यावर विश्वास आहे. “वृत्तमानस, केवळ या घटनेचं वार्तांकन करत आहे, घटमांडणीच्या परंपरेचं समर्थन करत नाही”.



Comments