top of page

राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयामध्ये मोफत स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्धाटन

ree

जव्हार आदिवासी ग्रामीण भागातील तरुणांना गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची संधी मिळावी या उद्देशाने राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार यांच्या वतीने रविवारी, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सरस्वती दालन, राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय, जव्हार येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन व मार्गदर्शन संवाद शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. अजय काशिराम डोके (IAS) यांच्या शुभहस्ते केंद्राचे उद्घाटन रिबीन कापून करण्यात आली. या वेळी वाचनालयाच्या परिसरात उत्साहाचे व स्फूर्तीदायक वातावरण होते.

त्यानंतर भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यानंतर वाचनालयाच्या वतीने डॉ. अजय डोके यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला. हा सत्कार डॉ. अनिल पाटील आणि हर्षद मेघपुरिया यांच्या हस्ते करण्यात आला.


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संवाद शिबीरात मुख्य वक्ते म्हणून डॉ. अजय डोके यांनी विद्यार्थ्यांना UPSC, MPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी प्रभावी अभ्यास पद्धती, वेळेचे व्यवस्थापन, मानसिक तयारी आणि योग्य दृष्टिकोन याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासातून विद्यार्थी जीवनात जिद्द, चिकाटी आणि ध्येयवेडी वृत्ती कशी ठेवावी याचे मार्मिक उदाहरण देत अनेकांना विचारप्रवृत्त केले. या संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी थेट प्रश्न विचारून शंका समाधानाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि प्रेरणेचे प्रतिबिंब दिसून आले.


या कार्यक्रमाला वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर, उपाध्यक्ष हर्षद मेघपुरिया, कार्यवाह मनोज कामडी, सदस्य डॉ. अनिल पाटील, प्रकाश चुंबळे, सुनीता उबाळे, ऍड. पारस सहाणे, वाचनालयाचे सर्व कर्मचारी, सभासद, वाचक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोज कामडी यांनी पार पाडले. राजे यशवंत वाचनालयाचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरणार असून, अनेकांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा मिळणार आहे. वाचनालयाने घेतलेली जबाबदारी संपूर्ण जव्हार तालुक्यासाठी एक आदर्श ठरणारी आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Comments


bottom of page