top of page

राज्यातील सहा जिल्ह्यांचे पालक सचिव बदलले, तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणीची जबाबदारी

मुंबई : राज्य शासनाने प्रशासकीय कारणास्तव राज्यातील सहा जिल्ह्यांच्या पालक सचिवांच्या (Guardian Secretaries) नियुक्त्यांमध्ये फेरबदल केले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (२३ फेब्रुवारी) यासंदर्भातील अधिकृत  शासन आदेश निर्गमित केला आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर, परभणी आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.


नव्या नियुक्त्यांनुसार, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ही जबाबदारी मिलिंद म्हैसकर यांच्याकडे होती. तर मिलिंद म्हैसकर (अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग) यांची आता वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


सर्वात चर्चेत राहिलेली नियुक्ती म्हणजे तुकाराम मुंढे यांची. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडे परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याआधी दीपक कपूर या जिल्ह्याचे पालक सचिव होते.


त्यानुसार मुंबई शहर: डॉ. आय.एस. चहल सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी श्रीमती मनीषा वर्मा (अप्पर मुख्य सचिव, कौशल्य व रोजगार विभाग) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


वाशिम: वाशिम जिल्ह्यासाठी किरण कुलकर्णी (सचिव, मराठी भाषा विभाग) यांची निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या पालक सचिवपदी आप्पासाो धुळाज (सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांची नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव हेमंत महाजन यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले असून, तात्काळ प्रभावाने हे बदल लागू करण्यात आले आहेत.

Comments


bottom of page