रायगडावरचा वाघ्या कुत्रा फेकून द्या; उदयनराजे भोसले संतापले, म्हणाले ही ब्रिटीशांची कुत्री
- Navnath Yewale
- Apr 12
- 1 min read

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद पेटलेला असताना भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्याचा पुतळा फेकून द्या असं स्पष्ट मत मांडलं आहे. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. तसंच ही ब्रिटिशांची कुत्री असल्याचं विधान केलं आहे.महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुलेवाड्यात आले असता ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
उदयनराजे भोसले यांना रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "कसला वाघ्या, ते कुत्रं बघा. भारतात कधी तुम्ही इतक्या लांब कानाचं कुत्रं कधी पाहिलं आहे का? ही सगळी ब्रिटिशांची कुत्री होती ना, ती आली. ही कुत्री ब्रिटीश असेल. दणका देऊन, फेकून द्यायचं. त्यात एवढा काय विचार करायचा ".
दरम्यान यावेळी त्यांनी राजभवनात शिवस्मारक उभारायला हवं असं मतही मांडलं.राज्यपालांना राहण्यासाठी इतकी मोठी जागा कशाला लागते? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, "राज्यपाल भवनाची जागा जवळपास 48 एकर आहे. त्या जागेत शिवस्मारक व्हावं. एखाद्या राज्यपालाला राहण्यास किती जागा लागते? 48 एकर म्हणजे थोडी जागा नाही. आणि अरबी समुद्राला लागूनच आहे.
त्या ठिकाणी शिवस्मारक व्हावं यासंदर्भात मी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्याची त्यांनी घोषणा करावी".
'महिलांची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली'
"एका दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केलं असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. तीदेखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं", असं उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
उदयनराजे यांच्या यांच्या या वक्तव्याचा समाचार ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी घेतला आहे. "जे सातारचे महाराज आहेत त्यांना महात्मा फुले यांनी 1 जानेवारी 1948 साली भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली यावरही आक्षेप आहे. एक नवा शोध उदयनराजे यांच्या माध्यमातून लागत आहे. यासाठी सगळे इतिहासतज्ज्ञ, संशोधक त्यांच्यासमोर फेल ठरले आहेत. उदयनराजे यांनी जो गौप्यस्फोट केला आहे हा महाराष्ट्राचा सामाजिक, शैक्षणिक क्रांतीचा इतिहास आहे त्याला धक्का देणारा आहे," असं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत.
Comments