राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द !
- Navnath Yewale
- Apr 25
- 2 min read
अंतर्गत गटबाजी उफळली; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटी नंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षात नाराजीच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. मात्र, पक्षाकडून नेहमीच अलबेल असल्याचे सांगण्यात येते. त्यातच आता पक्षांतर्गत वाद चांगलाच उफाळून आला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षप्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर दूसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने भाजप विरोधी भूमिका कायम ठेवली. दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचा धुव्वा उडाला. त्यानंतर पक्षात नाराजीचे वारे वाहू लागले. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अंतर्गत वादातून मोठी राजकिय घडामोड घडल्याचे समोर आले आहे.
पक्षाचे सर्व प्रवक्ते आणि पदाधिकारी यांच्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान या निर्णयामागे पक्षातील एका वादग्रस्त विषयावरुन निर्माण झालेली अंतर्गत कुरबूर असल्याचे बोलले जात आहे. 16 एप्रील रोजी झालेल्या पक्षाच्या एका महत्वाच्या बैठकीत पानिपत येथे केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या शौर्य स्मारकाला विरोध करण्याची भूमिका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. मात्र, पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी या भूमिकेला कडाडून विरोध केला. यामुळे बैठकीमधील वातावरण चांगलेच तापले होते.
प्राप्त माहितीनुसार, वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला विरोध केल्याने महेश तपासे यांची मुख्य प्रवक्तेपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्र, निर्णयाची अधिकृत घोषणा न करता सर्वच प्रवक्त्यांच्य नियुक्त रद्द करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन या निर्णयामागे कोण्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असे लक्षात येऊ नये.
महेश तपासे यांचे आजोबा आणि माजी राज्यपाल गणपत तपासे यांनीच पानिपत येथे पूर्वी शौर्य स्मारक उभारले होते. त्यामुळे महेश तपासे यांनी केंद्र सरकारच्या स्मारकाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षात मतभेद निर्माण झाले आणि नेत्यांच्या नाराजीला तोंड द्यावे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Comments