top of page

राहुल गांधींचा तो इशारा, ट्रम्पनी काढले फर्मान अन् मोदी सरकारची अशी झाली कोंडी

इराण आणि इस्त्राईल युद्धाचा भडका उडालेला असतानाच भारताबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. या यद्धामुळे जगातील अनेक देशांना गॅस आणि इंधनाचा तुटवडा जाणवण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामध्ये भारतही आहे. त्यावर अमेरिकेकडून भारतासाठी एक फर्मान काढण्यात आले आहे. त्याच्या काही दिवस आधीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलर्ट केले होते.


राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत बोलताना आपल्याला तेल कुठून, कुणाकडून खरेदी करायचे, यासाठी अमेरिकेकडून परवानगी घ्यावी लागू शकते, असे विधान केले होते. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेसमोर सरेंडर झाल्याची टीका केली होती. त्यानंतर आज अमेरिकेने भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची सूट दिली असल्याचे जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.


भारताने यापूर्वीच आपण तेल कुणाकडून घ्यायचे, यासाठी निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे स्पष्ट केले होेते. पण ट्रम्प सरकारच्या अर्थमंत्र्यांनी आज सोशल मीडियात एक पोस्ट करत म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अमेरिकी अर्थ मंत्रालयाने भारतीय रिफायनरींना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची तात्पुरती सूट दिली आहे.


ही सूट जाणीवपूर्वक कमी कालावधीची दिली आहे. त्यामुळे त्यातून रशियन सरकारला कोणताही मोठा आर्थिक फायदा होणार नाही. कारण आधीपासूनच समुद्रात अडकलेल्या तेलाच्या खरेदीसाठी ही सूट असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केली जात असल्याने भारतावर टेरिफ लादले होते. यापार्श्वभूमीवर वित्त मंत्र्यांच्या या पोस्टनंतर भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने यावरून राहुल गांधीचा जुना व्हिडीओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.


दरम्यान, राहुल गांधी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, भारताचे परराष्ट्र धोरण आपल्या लोकांच्या सामूहिक इच्छेतून तयार होते. ते आपल्या इतिहासात, आपल्या भूगोलात आणि सत्य आणि अहिंसेवर आधारित आपल्या आध्यात्मिक नीतीमत्तेत रुजलेले असले पाहिजे. आज आपण जे पाहत आहोत ते धारेण नाही. ते एका व्यक्तीने केलेल्या तडजोडीच परिणाम असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

Comments


bottom of page