top of page

रुग्णवाहिकेत चिमुकलीचा मृतदेह ठेवून आंदोलन: पुण्याच्या नवले पुलावर वाहतूक कोंडी, नराधम आरोपीस फाशीची मागणीआंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिस बळाचा वापर; चार तासानंतर वाहतूक कोंडी फुटली

पुणे: नसरापूर प्रकरणातील चिमुकलीला न्याय द्या, नराधमाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत पुण्याच्या नवले पुलावरील आंदोलकांना हटवण्यात आलं आहे. संतप्त आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत हा पूल मोकळा केला. त्यामुळे सुमारे चार तासांपासून सुरू असलेलं आंदोलन अखेर स्थगित झालं असून, प्रशासन, सरकारवर आंदोलकांनी गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला आहे. नवले पुलाची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्यानं अखेर वाहतूक कोंडी फुटली आहे.


भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये शुक्रवारी (दि.1) मे रोजी एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलं. चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेतच ठेवून त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.


नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे- बंगळुरु महामार्ग रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. संतप्त आंदोलकांची समजूत काढण्यासाठी दुपारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.


नसरापूरच्या चिमुकलीला न्याय द्या आणि नराधमाला फाशी द्या या मागणीवर आंदोलक ठाम होते. व्यवस्थेचे मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्या चिमुकलीचा मृतदेहही रुग्णवाहिकेद्वारे आंदोलनस्थळी आणण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चिमुकलीच्या कुटुंबाला फोन करावा आणि नराधमाला फाशी देत असल्याचं जाहीर करावं, अशी मागणी आंदोलकांनी केली.


आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली झाली. नवले पूलाच्या दोन्ही बाजूने वाहणांच्या रांगा लागा लागल्या. सुमारे चार तास हे आंदोलन सुरू होतं. पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी आंदोलकांसह चिमुकलीच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र, आंदोलक मागणीवर ठाम राहून, आंदोनातून माघार घेत नसल्याने सुरळीत वाहतूकीसाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, आणि नवले पूल रिकामा केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली.


दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन स्थगित झाल्यानंतर आंदोलकांनी माध्यमांशी संवाद साधत सरकार आणि प्रशासनावर टीका केली. नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांचा वापर करून आंदोलकांना हटवलं, सरकारची आम्हाला लाज वाटते, दडपशाहीचा वापर करणारं हे इंग्रजांचं सरकार आहे असा आरोपही यावेळी संतप्त आंदोलकांनी केल.

Comments


bottom of page