लक्ष्मण हाके यांना महागडी फॉर्च्यूनर लेजेंडर भेट; भंडारा उधळत मनोज जरांगेना इशारा !
- Navnath Yewale
- May 28
- 1 min read

आंतरवाली (सराटी) येथून मराठा आरक्षणाचा लढा उभारणार्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्यत्तरादाखल थेट वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव प्रतीआंदोलन करत राज्यभरातील सकल ओबीसींचा चेहरा बनलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सावरगाव( राणी) येथील ओबीसी बांधवांनी महागडी अशी फॉर्च्यूनर लेजेंडर गाडी भेट दिली. समाजाच्या कार्यासाठी ही गाडी मला देण्यात आली आहे, त्याचा मी वापर करणार असल्याचे सांगत लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर टिकेची झोड उठवली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना परभणीच्या राणी सावरगाव येथील ओबीसी बांधवांनी फॉर्च्यूनर लेजेंडर कार भेट दिली आहे. राणी सावरगाव येथील रेणुका माता मंदिरासमोर हि गाडी भेट देण्यात आली. यावेळी हाके यांनी ओबीसी बांधवांचे ऋूण व्यक्त करत परभणी आणि नांदेडच्या बॉण्ड्रीवर जिथे माझी गाडी फोडली होती तिथेच ही गाडी मला भेट देण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, आज राणीसावरगावमध्ये ही गाडी मला भेट देण्यात आली. समाजाचे कार्य हे पुढेच घेऊन जाणार, मला एसीमध्ये रहायची सवय नाही. मात्र, समाजाच्या कार्यासाठी मला ही गाडी देण्यात आली आहे. त्याचा वापर मी करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
हाकेंनी, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टिकेची झोड उठवली. मनोज जरांगे च्या डोक्यावर परिणाम झाला आहे, महारष्ट्राचे मुख्यमंत्री लोकनियुक्त आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो हा तमाम महाराष्ट्रातील जनतेचा अवमान आहे. याचाच अर्थ मनोज जरांगे यास लोकशाही मान्य नसल्याचे सांगत ओबीसी समाजाकडून जशास तशे उत्तर देणार असल्याचेही हाके म्हणाले यावेळी राणीसावरगाव येथील ग्रामस्थांसह माळाकोळी जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील सुरनर उपस्थित होते.
.. तर आम्हीही मुंबईकडे कूच करू
मनोज जरांगे ज्यादिवशी ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, अशी आडेलतट्टूपणाची भूमिका घेऊन मुंबईकडे निघेल, त्यादिवशी ओबीसी बांधवही माळेगाव येथून मुंबईकडे लाँग मार्च काढतील असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी यावेळी दिला.
Comentarios