लिंबागणेश परिसरात तरुणाचा गळा आवळून खून ; रस्ते अपघाताचा बनाव
- Navnath Yewale
- 4 days ago
- 1 min read

बीड: तालुक्यातील लिंबागणेश- अंजणवती रस्त्यालगत एका 27 वर्षीय तरुणाचा गळा आवळून निर्घुन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरूवातील हा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मृताच्या गळ्यावर आढलेल्या प्रणांमुळे हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मयत तरुणाचे नाव किरण बंडू सोनवणे (वय 27 वर्षे रा. अंजणवती, ता.जि. बीड) असे असून या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात अरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी 6:00 वाजेच्या सुमारास व्यायामासाठी जाणार्या काही महिलांना गणेशमाळ परिसरात रस्त्याच्या कडेलाएक व्यक्ती पडलेली दिसली. जवळ जाऊन पाहणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी एमएच16 एआर 2661 क्रमांकाची दुचाकीही आढळून आली होती. सुरुवातीला वादळी वार्यामुळे दुचाकीचा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
संशय अपघाताचा, तपासात उघड झाला खून : घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री परिसरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून अपघात झाला असावा, अशी चर्चा होती. मात्र, मृतदेहाची पाहणी आणि पुढील तपासादरम्यान किरण सोनवणे यांच्या गळ्यावर पांढर्या रंगाच्या गमच्याने आवळल्याच्या खुणा आढळल्या यामुळे हा अपघात नसून नियोजनपूर्वक खून करून अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल व प्राथमिक तपासाच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोधार्थ विविध पथके कामाला लागली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रीक पुराव्यांची तपासणी सुरू आहे. तरुणाचा खून झाल्याची माहिती परिसरात वार्यासारखी पसरल्याने अंजणवती, लिंबागणेश परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातील अपघात समजल्या गेलेल्या घटनेचे खुनात रुपांतर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.



Comments