लोक तुमचे सहानुभूतीदार आहेत, अंधभक्त नाहीत...
- Navnath Yewale
- Jul 1
- 2 min read
आनंद भंडारे
(लेखक नागरिकायन संशोधन केंद्राचे प्रमुख आहेत.)

सचिन अहिर यांनी ठाकरे कुटुंबियांना दगा दिला, हे वाईटच झालं. ठाकरे कुटुंबियांच्या पडझडीच्या काळात आणि ज्या पध्दतीने हे सारं चाललं आहे ते उद्वेगजनक आणि संतापजनक आहे, हे खरंच आहे.
मात्र, 'सचिन अहिरांची बंडखोरी नसून त्यांनी स्वत:ला विकलं आहे', अशी रूदाली ऐकण्यासोबतच थोडी आधीची क्रोनोलॉजी समजून घेवूया
ठाकरे कुटुंबियांच्यावतीने आदित्य ठाकरेंना २०१९मध्ये पहिल्यांदा आमदार करायचं होतं. त्याकरीता सुरक्षित मतदारसंघ त्यांना हवा होता...
खरंतर पाचपन्नास वर्षाचा ठाकरे घराण्याचा महाराष्ट्रावरील करिष्मा आणि पहिल्यांदाच घराण्यातून कुणी तरी विधानसभेची निवडणूक लढणार, हे पाहता महाराष्ट्रातल्या कुठल्याही मतदारसंघातून ते निवडून यायला हरकत नव्हती.
अगदी ते जिथे राहतात त्या वांद्रे पूर्व मतदारसंघातूनही ते निवडून येऊ शकले असते.
पण तो मुस्लिमबहुल लोकसंख्येचा मतदारसंघ असल्यामुळे त्याबद्दल तेव्हा ठाकरे कुटुंबियांना जिंकून यायची खात्री वाटली नाही.
शिवाय तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे तिकीट त्यासाठी कापावे लागले असते.
म्हणून मग वरळी मतदारसंघ निवडला आणि तत्कालीन आमदार सुनील शिंदेंचा बळी द्यायचा ठरवलं. म्हणजे दोन्ही गोष्टी ठाकरे कुटुंबियांच्या मनासारख्या झाल्या.
एक म्हणजे मराठीबहुल लोकवस्तीचा सुरक्षित मतदारसंघ मिळाला. आणि दुसरं म्हणजे महाडेश्वरांपेक्षा सुनील शिंदेंचा बळी देणं तुलनेनं 'दिसायला' कमी रक्तस्त्राव होणारं होतं!
खरंतर २०१४ला सुनिल शिंदे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. असे असूनही २०१४ ते २०१९ या पाच वर्षातील विधानसभेतील सर्वोत्तम आमदार म्हणून ज्यांचा उल्लेख प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात होता त्यामध्ये सुनील शिंदे यांचा क्रमांक फार वरचा होता.
मात्र तरीही त्यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आले.
पण स्वपक्षीय चांगल्या आमदाराचे तिकीट कापूनही आदित्य ठाकरे वरळीतून निवडून येतीलच याची खात्री ठाकरे कुटुंबियांना नव्हती.
कारण सचिन अहिर हे दोनदा वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मंत्री म्हणून कारभार सांभाळला होता. त्यावेळच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मुंबईतील चेहरा होता. कामगार चळवळीचा भक्कम आधार होता. जितेंद्र आव्हाडांनतर मोठ्या साहेबांचे ते ब्लू आई्ड बॉय होते.
२०१९ला ते पुन्हा निवडणूक लढवणार होते आणि तसे झाल्यास आदित्य ठाकरे यांना निवडून येणं सहजसोप्पं नव्हतं.
म्हणून मग मोठ्या पवारांशी संगनमत करून सचिन अहिर यांनाच आपल्या पक्षात सामील करून घेतलं.
झालं... ठरल्याप्रमाणे आदित्य ठाकरे निवडून आले.
मग सुनिल शिंदे आणि सचिन अहिर या दोघांनाही त्यांच्या त्यांच्या त्यागाचं आणि निष्ठेचं फळ म्हणून विधान परिषदेचे आमदार केले.
आता मला सांगा, ज्या आदित्य ठाकरेंनी स्वत:च्या आमदारकीसाठी स्वत:च्याच पक्षातील सुनील शिंदे या कर्तबगार आमदाराचे तिकीट ऐनवेळी कापले. वर सचिन अहिर यांना फोडून आपल्या पक्षात सामील करून घेतलं. त्या आदित्य ठाकरेंना आणि ठाकरे कुटुंबियांनाही आता सचिन अहिर पुन्हा दुसर्या पक्षात गेले म्हणून विकाऊ वगैरे म्हणण्याचा अधिकार आहे का?
नीलम गोऱ्हे यांचे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचे तिकीट कापले म्हणून Karma is Back असं त्यांना सुनावणार्या मंडळींनी, सचिन अहिर यांनी पक्ष सोडला म्हणून आदित्य ठाकरेंनाही Karma is Back असं का म्हणू नये?
म्हणजे तुम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी एखाद्याला पक्ष फोडून स्वत:कडे घेतलं तर ते टिकाऊ आणि मग तीच व्यक्ती तुम्हाला सोडून गेली की विकाऊ? हे असं कसं चालेल?
सचिन अहिरांना पक्षात घेतलं तेव्हा स्थानिक पातळीवरील वरळीतील कुठलाही शिवसैनिक खुष नव्हता. पण बाळराजेंचा हट्ट म्हणून सचिन अहिरांचे त्याला हसून स्वागत करावे लागले. आता सचिन अहिर पक्ष सोडून गेल्यामुळे तो सर्वसामान्य शिवसैनिक मनात हेच म्हणत असेल, बरं झालं, चांगली खोड मोडली!
त्यामुळे सगळं काही देऊनही सचिन अहिर तिकडे निघून गेले, असं उद्वेगाने म्हणत मिडियाला बाईट देणार्या आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांनीही सगळं काही आपण का आणि कशासाठी दिलं होतं, हे ही जरा मागे वळून पहावं.
लोकं तुमचे सहानुभूतीदार आहेत, अंधभक्त नाहीत, एवढं लक्षात ठेवा!



Comments