top of page

वर्धापन दिनीच शरद पवारांना मोठा धक्का; विश्वासूंची तुतारी सोडून कमळाला साथ



राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा आज पुण्यात 26 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच विश्वासूं सहकार्‍यांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला आहे. सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाटणकर आणि पाटील यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेतले.


शरद पवार यांचे विश्वासू सहकारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजितसिंह पाटणकर आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पदाधिकार्‍यांसह मंगळवारी (10 जून) राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनी भापमध्ये प्रवेश केला. रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


रविंद्र चव्हाण म्हणाले की, 2019 आणि 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विधानसभा उमेदवार असलेल्या सत्यजितसिंह पाटणकर आणि वैभव पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यात पक्षाला बळकटी मिळाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाटणकर आणि पाटील यांनी भाजपाला साथ दिली आहे. पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचा यथोचित मान राखला जाईल.


सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासोबत हिंदूराव पाटील, याज्ञसेन पाटणकर, राजाभाऊ शेलार, राजेश पवार यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला. पाटण तालुका दुधसंघ, अर्बन बँक आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन तसेच सर्व संचालकांनी सर्व आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, सदस्यांनी देखील तुतारी सोडून कमळ हाती घेतले आहे.यावेळी पाटण नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचाही भाजपामध्ये प्रवेश झाला.

Comments


bottom of page