top of page

वाचन प्रेरणा दिन



आज १५ ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. वाचन आणि लेखन आवडणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस संपूर्ण देशात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करून स्वतःला समृद्ध कसा करेल आणि त्यायोगे देश महासत्ता कसा बनेल असाच विचार माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम करत असत. अब्दुल कलाम यांनी १९९६ साली इंडिया २०२० हे पुस्तक लिहिले. याच पुस्तकाच्या आधारे तेंव्हाच्या नियोजन आयोगाने व्हिजन २०२० तयार केले. डॉ अब्दुल कलाम यांनी अग्निपंख नावाने आत्मचरित्र लिहिले त्यात त्यांनी बालपणापासून राष्ट्रपती बनण्यापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन केले आहे. डॉ अब्दुल कलाम यांनी एकूण २४ पुस्तके लिहिली असून त्यातील बहुतांशी पुस्तके विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीच लिहीली आहेत. विद्यार्थ्यांनी जास्तीतजास्त पुस्तके वाचून स्वतःचे ज्ञान दृढ करावे असा त्यांचा आग्रह होता. वाचनानेच माणूस समृद्ध बनतो असे त्यांचे मत होते. त्यासाठी लहान वयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करावी असे ते नेहमी म्हणत.


आजचा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चालले आहे. पूर्वी विद्यार्थ्यांमध्ये जशी वाचनाची आवड होती तशी वाचनाची आवड आजच्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत नाही. आजच्या सोशल मीडिया व इंटरनेटच्या युगात पुस्तक वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. विद्यार्थ्यांमधील अवांतर वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. पूर्वी गजबजणारी वाचनालये आता ओस पडू लागली आहेत. ग्रंथालयातील पुस्तके वर्षानुवर्षे एकाच जागी धूळ खात पडत आहेत. साहित्य संमेलनामध्ये पुस्तकांची विक्री कमी होऊ लागली आहे.


आजची पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने पुस्तकांपासून दूर होत चालली आहे. सोशल मीडियाच्या आक्रमणामुळे विद्यार्थी अवांतर वाचन विसरून चालले आहेत. सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शाळा महाविद्यालयात हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तके दिली जातात. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा केली जाते. आजच्या दिवशी शाळा महाविद्यालयात तसेच सरकारी आस्थापनात विविध कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रशिक्षणे आयोजित केली जातात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी सर्वानी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना एक पुस्तक पुस्तके भेट द्यावे. आजच्या दिवशी प्रत्येकाने किमान एक पुस्तक वाचावे.


वाचन प्रेरणा दिन हा एक स्तुत्य उपक्रम आहे. आजच्या युगात ज्ञान ही खूप मोठी शक्ती आहे, याचाच आपल्याला विसर पडला आहे. वाचनामुळे आपल्याला इतिहासाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध घेता येतो. ज्ञान मिळवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे वाचन. सातत्याने वाचन केल्याने आपली ग्रहण क्षमता आणि स्मरण शक्ती अधिकाधिक सशक्त होऊन बुद्धिमत्ता अधिकाधिक प्रगल्भ होते. त्यातून माणसाच्या विचार पातळीचा चोहोबाजूंनी विकास होतो. वाचनामुळेच माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो. चांगलं वाचल्यावर, चांगलं ऐकल्यावर आपले विचार विवेकशील व प्रगल्भ होतात. त्यातून आपली मनोभावना शुद्ध होते. आपली भाषा तसेच वक्तृत्व विकसित होते. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व बहरते. वाचन ही जीवनाला उन्नत करणारी बाब आहे यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलवण्यात वाचनाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करायला हवे.


मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात रमले पाहिजे. चांगल्या पुस्तकांचा, विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टकोन कायमचा बदलतो. ऐतिहासिक पुस्तकांमुळे वाचकांच्या मनात राष्ट्रनिष्ठा निर्माण होते. कथा - कादंबरी वाचनाने वाचकांच्या मनात माणुसकीचा भाव जागृत होतो. काव्य वाचनातून आपल्या मनात संवेदनशीलता निर्माण होते. थोरांची चरित्रे वाचून प्रेरणा मिळते. वर्तमानपत्रे वाचल्याने सामाजिक जाणिव निर्माण होते. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकलेला माणूस हत्या, आत्महत्या करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या मुलांना खूप ताण असतो. हा ताण कमी करण्याचे प्रभावी मध्यम म्हणजे वाचन एकूणच वाचनामुळे माणूस सर्वगुणसंपन्न होतो त्यांच्यात नैतिकतेची रुजवण होते. आज वाचनाअभावी समाजातील नैतिक मूल्ये हरवत चालली आहेत त्यामुळे नव्या पिढीने पुन्हा एकदा वाचन संस्कृतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. आपल्या आणि समाजच्या भल्यासाठी वाचन संस्कृती टिकवायलाच हवी. वाचल तर वाचाल या उक्तीप्रमाणे तरुण पिढीला वाचवायचे असेल तर त्यांच्यात वाचन संस्कृती रुजवायलाच हवी. त्यासाठी वाचन प्रेरणा दिन यासारखे उपक्रम नक्कीच उपयोगी ठरेल.


श्याम ठाणेदार

पुणे

1 view0 comments

Comments


bottom of page