top of page

वाल्मिक कराडला ‘सुप्रिम’ दणका, सर्वोच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला

नवीदिल्ली : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीनबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायमूर्ती एम.एस. सुंदरेश यांच्यासमोर आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने आज जरी जामीन नाकारला असला तरी वाल्मिक कराडला पुन्हा जामीनसाठी अर्ज करता येणार आहे,


पण त्यासाठी वाट पहावी लागणार आहे. कारण जरी ट्रायल पुढे जात नसेल तर वर्षभरात पुन्हा वाल्मिक कराड सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतो. या प्रकरणाची पहिली सुनावणी दि.19 फेब्रूवारी रोजी करण्यात आली होती. त्यानंतर आज या प्रकरणाची सुनावणी पार पडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. याआधी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आणि बीड जिल्हा न्यायालयात वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज आणि दोष मुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आला होता.


दरम्यान एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा गावात तीनवेळा येऊन गेल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला होता. ते प्रकरण ताजे असतानाच, आता सुप्रीम कोर्टाने वाल्मिक कराडला झटका दिला आहे.


सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीपूर्वी धनंजय देशमुख यांनी याबाबत कॅव्हेट दाखल केलं होतं. आमचे म्हणणे आम्ही न्यायालयात देणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलं होतं. मागील दीड वर्षापासून देशमुख कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचेही ते म्हणाले.


बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. 10 डिसेंबर रोजी या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार यांना केज तालुक्यातील तांबवा या ठिकाणाहून अटक केली. 12 डिसेंबर रोजी घुले या तिसर्‍या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली. 18 डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक करण्यात आले. 4 जानेवारी ला सुदर्शन घुले, सुधीर सांगळे ला पुण्यातून अटक झाली, तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक झाली. या प्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे.


दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत तीन वेळा गावी येऊन गेल्याचा दावा धनंजय देशमुुख यांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात माध्यमांशी संवाद साधताना केला. विशेष म्हणजे कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती त्यांनी सीआयडीला देखील दिल्याचे सांगितले. कृष्णा आंधळे मोबाईल वापरत नाही, मात्र त्याला जेरबंद कसे करायचे याचा विचार गरजेचा आहे. आमच्या कुटुंबाला या आरोपी पासून धोका आहे. हे आरोपी सैतानी वृत्तीचे असून कृष्णा आंधळेला अटक करून त्यांनी दिंड जिल्हाभरात काढावी, अशी मागणीही धंजय देशमुख यांनी यावेेळी केली.


वाल्मिक कराडच हत्येचा सूत्रधार:

माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटलं आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे. खंडणी, अ‍ॅट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

Comments


bottom of page