महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विश्वविजेता कॅरमपटू संदीप दिवे याला जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या जिगरबाज कॅरमपटूच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा हा विशेष लेख.

आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप दिवेने राष्ट्रीय कॅरम स्पर्धा जिंकण्या अगोदरच जागतिक कॅरम स्पर्धा जिंकण्याचा आगळा पराक्रम केला. या अगोदर असाच पराक्रम महाराष्ट्राचा युवा कॅरमपटू प्रशांत मोरेने लंडनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत केला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती संदीपने मलेशियात झालेल्या विश्व कॅरम स्पर्धेत करून दाखविली. जागतिक स्पर्धा जिंकणारा संदीप अजूनही राष्ट्रीय कॅरम स्पर्धेतील जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. अखिल भारतीय फेडरेशन चषक स्पर्धेत संदीप विजेता होता.
जागतिक कॅरम स्पर्धेत महाराष्ट्राच्या संदीप दिवेने पदार्पणातच 'विश्व विजेते' पद पटकावून या स्पर्धेत चांगलीच खळबळ माजविली. स्पर्धेपूर्वी संदीप जेतेपदाच्या शर्यतीत कुठेच नव्हता. त्याला देखील स्पर्धे अगोदर आपण विश्व विजेतेपद पटकावू असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. परंतु या स्पर्धेत जगज्जेत्याला साजेसा, आक्रमक आणि आकर्षक खेळ करून संदीपने विजेते पदावर कब्जा केला. या स्पर्धेतील त्याचा जबरदस्त खेळ पाहता तोच या स्पर्धेचा खराखुरा विजेता होता हे भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेल्या अरुण केदार यांचे मत बरेच काही संदीपच्या स्पर्धेतील कामगिरीबाबतचे योग्य मुल्यमापन करते.
१० वर्षांपेक्षा जास्त काळ स्पर्धात्मक कॅरम खेळणाऱ्या संदीपचा या खेळातील आलेख सतत उंचावत राहिला आहे. स्थानिक १०० पेक्षा जास्त स्पर्धात विजेतेपद मिळविणाऱ्या संदीपने १० वेळा जिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत ४ वेळा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद मिळविली. ४ वेळा तो उपविजेता देखील राहिला.
२०११ मध्ये कुर्ला येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत त्याने जेतेपद पटकावले. मग तेथून सुरू झालेली त्याची विजयी दौड कायम आहे. त्यावेळी आपल्या संघाला त्यानी सांघिक विजेतेपद देखील पटकावून दिले होते. त्यानंतर जिल्हा स्पर्धेत तब्बल १० वेळा तो विजेता ठरला. २०१८च्या फेडरेशन चषक स्पर्धेत त्याने पुरुष एकेरी आणि दुहेरी स्पर्धेत बाजी मारली. त्याची सातत्यपूर्ण चांगली कामगिरी बघून एअर इंडियाने त्याला आपल्या सेवेत दाखल केले. परंतु पुढे एअर इंडिया बंद पडल्यामुळे त्याची नोकरी गेली.
जागतिक स्पर्धेतील आपल्या विजेते पदाचे श्रेय तो प्रशिक्षक अरुण केदार यांना देतो. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कॅरम संघटना, अरुण केदार, अमेय कुलकर्णी, इक्बाल नबी, मुंबई उपनगर कॅरम संघटना, अनुपम जोशी यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळेच संदीप विश्व स्पर्धेसाठी जाऊ शकला. ही स्पर्धा जिंकून संदीपने या सर्वांनी केलेल्या मदतीचे चीज केले असेच म्हणावे लागेल. जागतिक स्पर्धा जिंकणारा संदीप हा मुंबई उपनगरचा पहिला कॅरमपटू ठरला.
कुर्ल्यात संदीप लहानाचा मोठा झाला. त्याचे वडिल चांगले कॅरम खेळायचे. त्यांचे बघूनच संदीप या खेळाकडे आकर्षित झाला. यानंतर त्याला इक्बाल नबी हे गुरु भेटले. त्यांचा संदीपला परिस स्पर्श झाला आणि मग संदीप या खेळात पुढे चांगलाच प्रकाश झोतात आला. ज्याप्रमाणे क्रिकेट विश्वातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरला घडविण्यात स्व. रमाकांत आचरेकर यांचे मोठे योगदान राहिले तसाच काहीसा प्रकार संदीप बाबत इक्बाल नबी यांच्या बाबत म्हणता येईल. आपल्या या संपूर्ण वाटचालीचे श्रेय संदीप नबी सरांना देतो.
अथक मेहनत आणि घेतलेल्या परिश्रमामुळे संदीपने जगज्जेते पदापर्यंत मजल मारली. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांचा यशस्वी मुकाबला संदीपने केला. त्यांनी कधी हार मानली नाही. सुरुवातीला ५-५, ६-६ तास सराव करणारा संदीप नंतर संपूर्ण दिवस देखील या खेळाचा सराव करू लागला. मग त्याचेच फळ संदीपला हळुहळू मिळू लागले. कॅरमच्या सरावासाठी त्यांनी ८वीपासून रात्र शाळेतदेखील प्रवेश घेतला होता. कट संदीपचा खूप आवडता फटका. सरळ सोंगट्या घेण्यात त्याचा हातखंडा आहे. आक्रमक खेळ करून सामने झटपट संपवायला संदीपला आवडतात. समोर कितीही मोठा खेळाडू असला तरीही संदीप घाबरून जात नाही. जय-विजयाचा तो विचार करत नाही. आपला सर्वोत्तम खेळ करून सामना जिंकण्याचा मात्र संदीप नेहमीच विचार करत असतो.
२०१९मध्ये ठाणे येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत संदीप देवरुखकर विरूद्ध झालेला सामना त्याच्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सामना होता. हा सामना तो कधीही विसरू शकत नाही. प्रशांत मोरे, श्रीनिवास, योगेश परदेशी, संदीप देवरुखकर, रियाज अकबर अली हे संदीपचे या खेळातील आवडते खेळाडू आहेत. या पाच पांडवांचा खेळ बघून मी बरेच काही शिकलो असे तो नम्रपणे नमूद करतो. क्रिकेट, टेबल टेनिस, स्नूकर हे त्याचे इतर आवडते खेळ. गाण्याची त्याला आवड असून जागरण, गोंधळ, खंडोबा कथा यामध्ये त्याचा सहभाग होता. देवाधर्माची गाणीदेखील तो चांगली म्हणतो. स्व. लता मंगेशकर, शंकर महादेवन, सोनू निगम, अतिफ अस्लाम या गायकांचा तो चाहता आहे.
सुरुवातीच्या काळात नोकरी मिळत नसल्यामुळे आणि त्यानंतर एअर इंडियातील नोकरी सुटल्यामुळे दोन वेळा संदीपने या खेळाला चक्क विराम द्यायचा निर्णय घेतला होता. परंतु पहिल्या वेळी इक्बाल नबी संदीपच्या मदतीला धावून आले. त्यामुळे तो पुन्हा कॅरम खेळू लागला. तर दुसऱ्या वेळी त्याची पत्नी प्रियांकाने संदीपला खूप मोठा आधार दिल्यामुळे पुन्हा त्याची पावले कॅरम बोर्डाकडे वळली. आज आपण या खेळात आहोत याचे पूर्ण श्रेय तो नबी आणि आपल्या पत्नीला देतो. सध्या त्याला जैन इरिगेशनमध्ये नोकरी मिळाल्यामुळे त्याची मोठी समस्या सुटली आहे. त्यामुळे तो पूर्णपणे खेळावर लक्ष अधिक जोमाने केंद्रीत करु शकतो. येणाऱ्या भावी काळात संदीपला राष्ट्रीय स्पर्धा जिंकून क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवायचा आहे. तसेच अमेरिकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेत हुकलेली सुवर्ण पदकांची हॅटट्रिक संदीपला आता पूर्ण करायची आहे.
सुहास जोशी
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
Comments