शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी संघटना आक्रमक!गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोधच- राजू शेट्टी
- Navnath Yewale
- Jun 25
- 2 min read

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प आखणी, भूसंपादनास राज्य शासनाने (24 जून) मंत्रीमंडळ बैठकीत 20 हजार कोटी रुपयांची मान्यात दिली. यातच आता शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पा विरोधात अखिल भारतीय किसान सभा आणि स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते काक्रमक झाले आहेत. त्यांनी शक्तिपीठास बाधित शेतकर्यांचा विरोध असेलच. पोलिस बळ वापरून विरोध करणार्या शेतकर्यांवर गोळीबार केला तरी शक्तिपीठ महामार्गास विरोध राहिल, असा इशारा स्वाभीमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, किसान सभोचे राष्ट्रीय नेते राजन क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
शेतकरी संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे राजू शेट्टी नमुद केले आहे की, राज्यातील 12 जिल्ह्यातून शेतकरी विरोध करीत आहेत. मंगळवारी सकाळीच धाराशिव जिल्ह्यातील शेतकर्यांनी मोजणी करणार्या अधिकार्यांना शेतातून पळवून लावले. तरीही सरकार महामार्ग रेटत आहे. मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे. ते लुटारुंचे टोळके झाले आहे. शक्तिपीठ महामार्गाबद्दल शेतकरी समान्य लोकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना बगल देऊन महामार्ग कामातून 50 हजार कोटींचा ढपला पाडण्याचा डाव आहे. सध्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लावली आहे. प्रलंबित बिलासाठी ठेकदार मोर्चे काढत आहेत. अनेक शालेय शिष्यवृत्या, योजनांचे अनुदान रखडले आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. असे असताना केवळ भ्रष्टाचाराचा ढपला मारण्यासाठी सरकार शक्तिपीठ महामार्गाचा घाट घालत असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाला शेताकर्यांनी तीव्र विरोध केला आहे. ठिकठिकाणी महामार्गाला विरोध करत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली, तर सांगलीच्या आटपाडीमध्ये महामार्गाची मोजणी शेतकर्यांनी रोखली आहे. शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असून या महामार्गात अनेक शेतकर्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत. परंतु शासन शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प राबवण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. शेतकरी मात्र आपल्या जमिनी देण्यास तयार नाहीत. त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी- शासन यांच्यात संघर्ष निश्चित माणला जात आहे.
नांदेडच्या मालेगांवात बोंबमारो आंदोलन :
नांदेडमध्ये मालेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग 222 वर शेतकर्यांनी शासनाच्या आदेशाची होळी करत सरकार विरोधात बोंब मारो आंदोलन केले. या आंदोलनात नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात बाधित शेतकर्यांनी सहभाग घेतला होता. शक्तिपीठ महामार्ग शेतकर्यांच्या हितासाठी नसून काही मोजक्या लोकांच्या हितासाठी शेतकर्यांवर लादण्यात येत आहे. या महामार्गात हजारो कोटीचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याच्या भावना यावेळी आंदोलन शेतकर्यांनी व्यक्त केल्या.
सांगलीच्या आटपाडीत मोजणी रोखली:
नगापूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचार्यांना सांगलीच्या आटपाडीतील शेटफळे येथील शेतकर्यांनी रोखून धरले. संतप्त शेतकर्यांकडून भूसंपादनाच्या मोजणी प्रक्रियेला जोरदार विरोध करण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत मोजणी होऊ देणार नाही; अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोजणी प्रक्रियेसाठी आलेल्या अधिकारी,कर्मचार्यांना ताटकळत बसावे लागले.
मोजणीचा ड्रोन गोफणीने टिपू :
शेतकर्यांचा जागेवर येऊन मोजणीस विरोध होऊ लागल्याने ड्रोनच्या माध्यमातून मोजणी करण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पण शिवार लूटणार्या पाखरांना गोफणीच्या माध्यमातून कसे टिपायचे, हे शेतकर्यांना चांगले कळते. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गाची ड्रोनद्वारे मोजणी केल्यास त्याला गोफणीने टिपले जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
Comments