top of page

शिंदे गटात जाण्यास नकार देणार्‍या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यास बेदम मारहाण




शिवसेनेत तीन वर्षापूर्वी उभी फूट पडली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार व 12 खासदार गेले. त्यावेळेसपासून शिवसेनेतील उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे या दोन गटात आडवा विस्तवही जात नाही. छोट्या-मोठ्या कारणाने या दोन गटातील नेते व कार्यकर्ते अनेकवेळा एकमेकांसमोर आले आहेत. त्यातच आता धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.


यामध्ये शिंदे गटात जाण्यास नकार देणार्‍या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजते. या जखमी कार्यकर्त्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरू केला आहे. प्रशांत साळुंके असे मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने गळा दाबुन त्यांना मारहाण केली. त्यासोबतच यावेळी त्यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केल्याने जखमी प्रशांत साळुंके यांना तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.


शहरातील संंभाजीनगर येथील काकडे प्लॉट परिसरात ही घटना घडली. या घटनेने धारशिव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटात सामील का होत नाही? असा जाब विचारत प्रशांत साळुंके यांना शिंदे गटाच्या सुदर्शन गाढवे, विनोद जाधव यांच्यासह इतर दोघांनी लोखंडी रॉडने मारहाण केली. याशिवाय प्रशांत साळुंके यांनी एका गुन्ह्यात साक्षीदार असल्याच्या कारणावरून ही मारहाण झाल्याचा आरोप केला जात आहे.


या प्रकरणी धाराशिव पोलिसांत शिंदे गटाचे सुदर्शन गाढवे, विनोद जाधव यांच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोखंडी मारहाण केल्याने प्रशांत साळुंके जखमी झाले आहेत. जबर मारहाणीमुळे त्यांचा पायाला फॅक्चर असून शहरातील खासगी रुग्णालयात ठाकरे गटाचे जखमी प्रशांत साळुंके यांच्यावर उपचार सुरू आहेत. आनंदनगर पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments


bottom of page