top of page

शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक !

विधानसभेत सलग तिसर्‍या दिवशीही खडाजंगी, विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव


राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आज सलग तिसर्‍या दविशी विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. विरोधकांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर चर्चा नाकारल्यानंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशानाच्या आजच्या तिसर्‍या दिवशीचे कामकाज सुरू होताच विधानसभेत विरोधकांकडून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव दाखल करण्यात आला. अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी प्रश्न-उत्तराच्या तसाला सुरुवात केल्यानंतर विरोधक आक्रमक झाले. काल दुसर्‍या दिवशी शेतकर्‍यांच्या मुद्दयावर बोलतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते.


आज तिसर्‍या दिवशी शेतकर्‍यांच्या मुद्दयावर विरोधक विधानसभेच्या कामकाज सुरू होण्या आधी विधानभवनासमोर आणि नंतर विधानसभेतही विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासापासूनच शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून गोंधळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा नाकारल्यानंतर विरोधकांनी चांगलाच गदारोळ केला. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका केली.


प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. महाराष्ट्र हे सार्वाधिक आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांचे राज्य ठरत आहे. शेतकर्‍यांशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्वाचा आहे? स्थगन प्रस्तावावर चर्चा करणे गरजेचे आहे . शेतकर्‍यांना कर्जमाफी करतो, नुसत सांगितलं जातं पण कर्जमाफी दिली जात नाही. त्याउलट लोणीकर, कृषिमंत्री कोकाटे यांच्यासारखे मंत्री शेतकर्‍यांचा अपमान करतात. असे म्हणत वडेट्टीवार अक्षरश: सरकारवर तुटून पडले. फक्त 3 महिन्यात जर 767 शेतकरी आत्महत्या करत असतील तर हे सरकार नेमके कोणासाठी चालत आहे? असा सावाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


महामार्ग करण्यासाठी सरकारची तिजोरी आहे आणि शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? शक्तीपीठ महामार्गाला दणक्यात 20 हजार कोटी रुपये देऊ शकता, पण शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी तुमच्याकडे पैसे नाहीत? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.


नुकताच सोशल मिडियावर एका शेतकर्‍यांचा व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील अंबदास पवार आणि त्यांच्या पत्नी यांनी स्वत: वखर चालवतानाचा हा व्हिडिओ आहे. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. लातूर जिल्ह्यातील एका शेतकर्‍याकडे बैल घेण्यासाठी पैसे नाहीत. अशावेळी स्वत: तो जोतं खांद्यावर घेऊन नांगरताना दिसत आहे, त्याची 70 वर्षाची पत्नी डोळ्यामध्ये पाणी आणून जोत हाकते आहे. नवरा बैलाच्या जागी जुंपला आहे. अधिवेशन चालू असताना मग आम्ही सरकारकडून जबाब मागायचा नाही तर मग आम्ही कधी आणि कोणाला मागायचा?


एरव्ही सरकार वाटेल ते घोषणा करते, पण अधिवेशन चालू असताना सरकार शेतकर्‍यांचे प्रश्न ऐकून घेत नाहीत. मग,कसले शेतकर्‍यांचे सरकार? असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर म्हणाले की, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाचा प्रस्ताव तुम्ही शुक्रवारी मांडा, आपण पूर्ण दिवस यावर चर्चा करू, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विरोधकांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आत्ताच चर्चा करा, अशी मागणी केली.


यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची आमची तयारी आहे. सरकारविरोधात गैरसमज पसरवण्यासाठी विरोधकांचा गदारोळ सुरू आहे. विरोधकांकडून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर राजकारण सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. या गोंधळातच प्रश्न- उत्तराच्या तासाला सुरुवात करण्यात आली.

कामकाजाच्या मधल्या सुट्टीत विधानभवना समोर माध्यमांशी बोलताना सत्ताधारी सारवासारव तर विरोधक आक्रमक पावित्रा घेत आहेत.

Comentários


bottom of page