संत श्रेष्ठ ज्ञाणोबा, जगद्गुरु तुकोबांचा पालखी सोहळा पुणे मुक्कामी
- Navnath Yewale
- Jul 9
- 1 min read

पुणे : पुुणे शहरात आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालख्यांचे आगमन झाले. पुणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक तीन टप्प्यांत बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना वाहतुक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पालखी मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात गुरूवारी पहाटे 3:00 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बोपखेल फाटा, कळस, विश्रांतवाडी, फुलेनगर, आळंदी रोड जंक्शन, चंद्रमा चौक, सादलबाबा चौक, संगमवाडी रस्ता, वाकडेवाडी, खडकी आणि पाटील इस्टेट चौक परिसरातील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
दुसर्या टप्प्यात दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्ता, जंगली महाराज रस्ता आणि कर्वे रस्ता या मार्गांवरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यानंतर तिसर्या टप्प्यात सायंकाळी 5 नंतर छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता तसेच पेठ परिसरातील वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
दरम्यान, दरम्यान दिवस पुण्यात मुक्काम करणार्या वारकर्यांसाठी महापालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पालिकेच्या 101 शाळांमध्ये मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून शहरातील एकून 195 ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. यामध्ये सहा अत्याधुनिक जर्मन हंगर उभारण्यात आले असून, प्रर्दशनासाठी या प्रकारच्या जर्मन हंगरचा प्रथमच वापर करण्यात आला आहे.
वारकर्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 40 ठिकाणी वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर विविध ठिकाणी हिरकणी कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वारकर्यांच्या सेवेसाठी 180 फिजिओथेरपिस्ट,400 वैद्यकीय किट्स तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी 15 टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पालखीच्या दोन दिवसांच्या मुक्कामादरम्यान 10 जुलै रोजी रात्री 9 वाजता सामुदायिक पसायदानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कुठूनही सहभागी होता येणार असल्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या भाविकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.



Comments