सचिन आहिर फुटताच ठाकरे सेनेची वरळीत तातडीची बैठक
- Navnath Yewale
- Jun 30
- 2 min read

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गेल्या काही काळापासून मोठे हादरे सोसावे लागत आहेत. गेल्या आठवड्यात ६ खासदारांनी साथ सोडल्यानंतर आज विधान परिषद आमदार सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. या बड्या धक्क्यानंतर आत ठाकरे गटाने वरळीत डॅमेज कंट्रोलसाठी पदाधिकार्यांची तातडीची बैठक बोलावली. सर्व विभाग प्रमुख, सर्व शाखा आणि इतर पदाधिकारी या बैठकीला हजर होते. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सुनील शिंदे यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना पेडणेकर म्हणाल्या आज या ठिकाणी सच्चे शिवसैनिक आहेत. अगदी शाखेपासून काम करत आहेत. विभाग प्रमुख देखील आहेत. संजय कदम यांच्या तालमीत आम्ही तयार झालो. नरायण राणे फुटले तेव्हा देखील आम्ही होतो, मागून येऊन अनेक जणांना खूप दिलं, जुन्या लोकांना पान पुसली. मी अनेक वेळा सांगितलं काय आहे. कोण आहे नीलम गोर्हे? काय तिच्यात ? संयज राऊत यांनी काय कमी केलं . आपल्याला बोलले हे टायगर गेले. हे लोक बोकडं आहेत.’
पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, आता सगळं फोडा फोडीचं राजकारण सुरू आहे, सगळा चिखल झाला आहे. आपण पक्षात एकत्र आलं पाहिजे. कुठे काय असलं तर त्याचा बाहेरचा फायदा घेतो. बाहेर जाऊन वेगळं काही बोलू नका. सचिन आहेर यांना भावा सारखे प्रेम दिले पण तुम्ही असे वागले, सचिन आहेर हे पांढर्या पायाचे आहेत ते आले आणि सत्ता गेली. पण आता पाल्याला एकत्र यायचं आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.
आमदार सुनील शिंदे म्हणाले की, आज आपण इथे एकत्र आलो, हे फुटून गेले पण आपण एकत्र आहोत. ते आले होते तेव्हा ते गद्दारी करून आलेले. आज आदित्य ठकारे यांना बोललो की नका येऊ बैठकीला, तुमच्या कडे अनेक विषय आहेत. कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे म्हणून ही बैठक आहे. या ठिकाणी सगळे लोक आदित्य ठाकरे यांना निवडून देणारे आहेत. निवडणुकीत आमच्या विरोधात देखील राजकारण केलं पण लोकांनी आदित्य ठाकरे यांना निवडून दिलं.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले ‘ हा मतदार संघ बाळासाहेब यांचा आहे. आक्रमक शिवसैनिक या ठिकाणी आहेत. अजूनही आमच्याकडे अनेक चेहरे आहेत जे आमदार होऊ शकतात. आतापर्यंत सगळी महत्वाची पद त्यांना मिळत होती. पण कार्यकर्त्यांनी समजवण्याचं काम आम्ही करायचो . आदित्य ठाकरे फक्त माझंच ऐकतात असे सांगायचं आणि फाटाफूट करायचे. नगरसेवकचं तिकिट देतो, नगरसेवक बनवतो असं सांगून फूट पाडण्याची काम शाखेत केली. पण आज माझा शिवसैनिक इथे आहे आणि कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही’ असा इशाराही आमदार शिंदे यांनी यावेळी दिला.



Comments