top of page

सचिन आहिर यांचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र, शिंदेच्या सेनेकडून उपसभापतीपदासाठी भरला उमेदवारी अर्ज

मुंबई : सचिन आहिर यांचा शिवसेनेला जयमहाराष्ट्र, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून केला अर्ज दाखल

सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार सचिन आहिर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सचिन आहिर हे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेते मानले जात होते. वरळरी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यात आहिर यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. आता त्यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केले आहे.


सचिन आहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे यांचे फुटीर मतदारसंघात दौरे सुरू असतानाही ही राजकीय घडामोड घडली आहे.


एक एक विकेट पडत राहिल, शिंदेंचा टोला: सचिन आहिरांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ २०२८ पर्यंत आहे. त्यापूर्वीच त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आज सचिन आहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. “ सचिन आहिर यांनी आज षटकार मारला, मागच्या आठवड्यात सहा खासदारांनी षटकार ठोकले. आता सहा मतदारसंघात काही लोकं जाऊन आले. त्यांचे सचिन आहिर यांनी षटकार मारून स्वागत केले आहे. चौकार, षटकार सुरूच आहेत आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहिल, ” असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लगावला.


सचिन आहिर हे तीनवेळा विधानसभेचे आमदार होते. आता विधानपरिषदेचे आमदार आहेत. ते राज्यमंत्री होते. सात विभागांचे राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे होते. गिरणी कामगारांचे नेते म्हणून त्यांनी काम केले. अनेक संघटनांमध्ये त्यांनी प्रमुख पदावर काम केले. मुळ मुंबईकर भूमिपूत्र असलेल्या काळी बांधवांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून त्यांची ओळख राहिली आहे. ते तळागळात काम करणारे नेते असल्याचेही शिंदे म्हणाले.


दरम्यान, सचिन आहिर यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाचा अर्ज भरला. आज महायुती विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन्हीकडे बहुमतात आहे. उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. ते आल्यामुळे शिवसेनेची मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ताकद वाढेल. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. एक टीम म्हणून करण्यात अहिर यांचा हातखंडा असल्याचंही शिंदे यावेळी म्हणाले.


आम्ही तोडायला नाही, जोडायला आलो आहे. काही लोकं तुडवायला आले आहेत. आम्ही शिवसेना वाढवायला आलो आहोत. ही आमची भूमिका आहे असंही शिंदे यांनी स्पष्ट केले.


“ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपसभापती या पदावरती मान देऊन तळागळातील कार्यकर्ता या पदापर्यंत जाऊ शकतो, हे दाखवून देण्याचे काम शिंदे यांनी केले आहे, अशी भावना आहिर यांनी व्यक्त केली.


कोणी जाण्याने धक्का बसत नाही- अदित्य ठाकरे: अहिर यांच्या या निर्णयावर आमदार अदित्य ठाकरे म्हणाले की, “ जे जवळचे लोक आहेत, ज्यांना सगळे काही मिळते. हेच लोक स्वत:च्या स्वार्थासाठी निघून जातात. हे आम्ही पाहात आलो आहे. यात नवीन आणि धक्का बसण्यासारखे काही नाही. वरळी, शिवडी हा बालेकिल्ला होता, अजूनही आहे. यामुळे कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही, असे अदित्य ठाकरे म्हणाले.

Comments


bottom of page