स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय पक्ष्याला स्वातंत्र्याची भरारी; सर्पराज्ञीतून मोराची निसर्गात झेप
- Navnath Yewale
- Aug 16
- 2 min read

बीड: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभर साजरा होत असतानाच बीड जिल्ह्यातील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात एका राष्ट्रीय पक्ष्याला नवजीवनाची आणि स्वातंत्र्याची अनोखी भेट मिळाली. नायगाव मयूर अभयारण्यात व्हायरल इन्फेक्शनने बाधित झालेल्या मोरावर तब्बल दोन महिने उपचार व सेवा-सुश्रूषा केल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या मोराला पुन्हा निसर्गाच्या मुक्त वातावरणात सोडण्यात आले.
नायगाव मयूर अभयारण्यात आजारी अवस्थेत आढळलेल्या या मोराला वन विभागामार्फत सुमारे दोन महिन्यांपूर्वी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असलेल्या या मोरावर केंद्रातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सातत्याने उपचार करण्यात आले. औषधोपचारांसोबतच योग्य आहार, सुरक्षित निवारा, नियमित निरीक्षण आणि आवश्यक सेवा-सुश्रूषा करण्यात आली.
दोन महिन्यांच्या अथक उपचारांनंतर मोराची प्रकृती पूर्णपणे सुधारली. तो स्वतःहून अन्न घेऊ लागला, सक्रिय झाला आणि नैसर्गिक हालचाली करू लागल्याने त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी योग्य असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे, वनरक्षक बद्रीनाथ परजणे, डॉ. दीपक देशपांडे, डॉ. शिरीष जोशी, मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे आणि सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोराची निसर्गात मुक्तता करण्यात आली.
मुक्ततेनंतर मोराने मोकळ्या वातावरणात पुन्हा स्वच्छंदपणे वावर सुरू केला. उपचार केंद्राच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे परतणाऱ्या या राष्ट्रीय पक्ष्याची भरारी उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक आणि समाधानाचा क्षण ठरला.
“स्वातंत्र्य म्हणजे केवळ मानवाचा अधिकार नाही”
यावेळी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या संचालिका सृष्टी सोनवणे म्हणाल्या,
“खुल्या आकाशाखाली मानवाला स्वातंत्र्य असते, असे नाही; प्रत्येक जीवाला येथे स्वातंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या १५ ऑगस्ट रोजी आपल्या राष्ट्रीय पक्ष्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करून आम्ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यदिन साजरा केला.”
वन्यजीव जखमी किंवा आजारी अवस्थेत सापडल्यानंतर त्यांच्यावर उपचार करून केवळ त्यांचे प्राण वाचवणे नव्हे, तर त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे परतवणे हीच खरी वन्यजीव संवर्धनाची प्रक्रिया आहे. सर्पराज्ञीच्या माध्यमातून अशा वन्यजीवांना उपचार, आधार आणि पुन्हा निसर्गात परतण्याची संधी मिळत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एका राष्ट्रीय पक्ष्याला मिळालेले हे स्वातंत्र्य म्हणजे निसर्ग, वन्यजीव आणि माणुसकी यांच्यातील अतूट नात्याचा भावस्पर्शी संदेश ठरला.



Comments