हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण
- Navnath Yewale
- May 26
- 1 min read

हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा व परिसर सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते संपन्न झाला. या सोहळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
नांदेड शहरातील कै.वसंतराव नाईक चौक येथे पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इतर मागास बहूजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक उर्जा तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, बाळासाहेब ठाकरे हरिद्रा ( हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुसिंग महाराज राठोड, आमदार बाबुराव कदम, आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोउे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मंचावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर शाह यांनी कळ दाबुन पुतळ्याचे अनावर केले. तसेच त्यांच्या हस्ते नामफलकाचेही अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बंजारा समाजाच्यावतीने शाह व फडणवीस यांचा पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बंजारा समाजाचे नागरिक उपस्थित होते.
हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांचा पूर्णकृती पुतळा नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने नांदेड शहरातील कै. वसंतराव नाईक चौक परिसरात उभारला आहे. नऊ फूट उंचीच्या या पुतळ्याचे वजन सुमारे 700 किलो आहे. पुतळ्याच्या उभारणीसाठी 13 लक्ष 99 हजार रुपये एवढा खर्च आला आहे. 232.60 चौ.मी. जागेत या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. सुशोभिकरणाचे अंदाजे 69 लाख रुपयांची कामे आहेत.
Comments