हल्लेखोरांना जशास तसे उत्तर देऊ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- Navnath Yewale
- Jul 14
- 2 min read
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद, मेहकरमध्ये रास्ता रोको, पुण्यात धरणे

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे (14 जूलै) सायंकाळी संयुक्त रास्ता रोको करण्यात आला. यावेळी रस्त्यावर ठिय्या देवून संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी निदर्शने करत हल्ल्याचा निषेध केला.
येथील जिजाऊ चौक येथे संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील अक्कलकोट येथे झालेल्या जिवघेण्या हल्ल्याविरोधात आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद, भारत मुक्ति मोर्चा, बामसेफ, जमिअतए-उलेमा -हिंद, जमात ए इस्लाम हिंद, भिमशक्ती संघटना, बी एस फोर, गरीब ग्रेड संघटना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आम आदमी पाटी, महाराष्ट्र नाभीक महामंडळ, छात्रभारती विद्यार्थी संघटना तसेच अनेक शिवप्रेमींच्या उपस्थितीत रस्त्यावर निदर्शने करण्यात आले. यावेळी सर्व संघटना व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतिने तहसील कार्यालयामार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन पाठवण्यात आले.
प्रीवण गायकवाड यांच्यावरील हल्ला करणार्या दीपक काटे याच्यासह साथीदारांवर कठोर कारवाईची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान कारवाईस दिरंगाई झाल्यास राज्यात कायदासुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा इशाराही यावेळी पदाधिकार्यांनी दिला. हल्लेखोरांना जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही यावेळी आंदोलनात सहभागी विविध संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी परमानंद गारोळे, विश्वनाथ बाहेकर, विलास तेजनकर, पांडुरंग पाटील, दत्ता घनवट, अॅड. विष्णु सरदार, अशोक तुपकर, भागवत जाधव, माधव ससाने, योगेश निकस, म.जावेद, सत्तार शाह अफसर शाह, कैलास सुखदाने, भानुदास पवार, शंकर चांगाडे, विजय चव्हाण, गजानन मेटांगळे, मुरलीधर, निकाळजे, गजानन चेके, नितीन पिसे, गजानन पवार आदींसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे आज दिवसभर राज्यभरात तिव्र पडसाद उमटले. संभाजी ब्रिगेड समविचारी संघटनांनी आक्रमक पावित्रा घेत हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. पुण्यात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा यासह समविचारी संघटनांच्या वतिने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, इतिहासकार श्रीमंत कोकाटे आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोपींना व्हिआयपी ट्रिटमेंट
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील मारहाण प्रकरणी आता काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वत: प्रवीण गायकवाड यांनीच हे गंभीर आरोप केलेले आहेत. आरोपींवर हवी ती कलम लावण्यात आलेली नाहीत, असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला आहे. तसंच अनेक मंत्र्यांकडून आणि गृहमंत्रालयातून देखील पोलिसांना या प्रकरणासंदर्भात फोन गेले असल्याचा खळबळजनक आरोपही प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान अक्कलकोट येथे शाईफेक करत मारहाण करण्यात आली होती.



Comments