top of page

हिंदी भाषासक्ती विरोधात ठाकरे बंधु एकत्र

राज ठाकरेची सर्वपक्षीय साद ; उद्धव ठाकरेंचा प्रतीसाद




राज्यात पहिली पासून हिंदी भाषेच्या सक्तीच्या सरकारच्या निर्णया विरोधात मनसेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात विविध संघटनांकडून हिंदीभाषा सक्तीच्या विरोधात आंदोलनं होत आहेत. त्यातच हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी मुद्यानुसार हिंदी भाषा सक्तीला विरोध मनसे आणि शिवसेना (उबाठा) पक्षांची भुमिका एक असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राज्यात ठाकरे बंधु युतीचे वारे वाहत असतानाच राज ठाकरे यांच्या मोर्चाच्या अवाहनाला उद्धव ठाकरे यांनी प्रतीसाद देत मराठी माणसांनी सहभागी होण्याचे अवाहन केले. त्यामुळे येत्या 6 जुलैला पहिल्यांदाच एका भुमिकेत ठाकरे बंधु महाराष्ट्राला एकत्र दिसणार आहेत.


मनसे प्रमुख राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, येत्या 6 जूलैला सरकारच्या या निर्णयाविरोधात गिरगाव चौपाटीवरून भव्य मोर्चाचे आयोजन करत आहोत. या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल, केवळ मराठीचा अजेंडा असेल असं सांगत राज यांनी सर्व राजकीय पक्ष, मराठी कलावंत, साहित्यिक यांना मोर्चात सहभागी होण्याचं अवाहन केले आहे.


या मोर्चाबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केल्याचे सांगत ते या मोर्चात येतील का? असा प्रश्न विचाला. यावर राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर ते देखील त्यात आले. त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्या नेत्यांशीही बोलणार, आमची माणसं त्यांच्या लोकांशी बोलतील. ज्या विधानावरून जे सगळं चाललेय ते विधान तुम्हाला आठवत असेल, कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे लक्षात ठेवा. हे वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल असं राज यांनी म्हटले.


तसेच रविवार यासाठी आहे जेणेकरून सगळ्यांना येणे सोपे जाईल. महाराष्ट्राची ताकदही त्यातून सरकारला दिसेल. रविवार आहे शाळा बंद असतात, पालकांना-विद्यार्थ्यांना यायला सोपे आहे. त्रिभाषा सूत्र मान्य नाही. पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही. राज्यांवर ही गोष्ट सोपवलेली नसताना राज्य सरकार हिंदी भाषा का आणतेय हे कळत नाही. आयएएस अधिकार्‍यांच्या मुलासाठी सीबीएसई शाळा राज्यात आणल्या होत्या. मात्र आता या शाळा राज्यांतील शाळांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.


उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा :

महाराष्ट्रावर हुकूमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवली हे दिसून आली. कुठल्याही भाषेचा द्वेष नाही. जे आंदोलन उभे राहील त्यामागे शिवसेना खंबीरपणे उभे राहील. हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि राहणारच..! हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. महाराष्ट्रात हिंदी चित्रपटसृष्टी बॉलिवूड उभे राहिले. आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सक्तीमागे छुपा अजेंडा आहे. कालांतराने देशात एकच पक्ष राहील त्यादिशेने ही वाटचाल सुरू आहे. सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जातेय, त्याचा विरोध आम्ही करणारच आहोत. बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे गद्दारांना कळायला हवे. हिंदी सक्ती नको म्हणजे नको, हिंदी शिकली नाही तरी ती येते. ही सक्ती आम्ही मान्य करणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Comments


bottom of page