top of page

हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण; समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार - मुख्यमंत्री फडणवीस




हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


हींदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्ध महामार्गाच्या अंतिम टप्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.


समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार :

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळ—े विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत. आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. 701 किलोमिटर लांबीच्या या महामार्गासाठी 55 हजार 335 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.


समृद्धी महामार्गाचा 76 किलोमिटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा 8 किलोमिटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा व देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे.

समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याचबरोबर दर 500 मिटर अंतरावर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर उर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी 35 मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणार्‍या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळ जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसर्‍या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मतद होईल. असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार:

महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञाणाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून 100 प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यानी व्यक्त केला.


समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादिचे पालन करावे असे अवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.


जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा 10 कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्या येईल. असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


तत्पूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले

Commentaires


bottom of page