हुंड्यात 51 तोळे सोनं, फॉरच्यूनर, चांदीची भांडी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या, पती, सासू आणि नणंदेला अटक मयत वैष्णवीच्या आई-वडिलांचा हुंडाबळीचा आरोप
- Navnath Yewale
- May 21
- 2 min read

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूनेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत. शुक्रवारी 33 वर्षीय वैष्णवी आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यापैकी पती शशांक, सासू आणि नणंदेला अटक करण्यात आली आहे. तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. वैष्णवीचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. वैष्णवीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सासरचे लोक हुंड्यासाठी मागणी करत मुलीची सतत मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. तिच्या शरिरावर मारहाणीच्या खूणा आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्यात छळ आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या दिवशी, वैष्णवीने 16 मे रोजी स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं होतं. काही वेळाने पती शशांकने दरवाजा ठोठावला. आतून काहीच उत्तर न मिळाल्याने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर तिने आत्महत्या केल्याचं उघड झालं. वैष्णवीला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केलं.
दरम्यान, राजेंद्र हगवणे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष असल्याने त्यांना अटक होत नसल्याचा आरोप पिंपरी चिंचवडचे पोलिस अधिक्षक सुनिल कुर्हाडे यांनी फेटाळला आहे. पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.
त्यामुळे सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिराविरोधात गुन्हा दाखल आहे. पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आली आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दिराचा शोध सुरू आहे.
महिला आयोगाकडून दखल
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची माहिला आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय महिला अयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना निष्पक्ष व वेळेत चौकशीचे आदेश दिले आहे. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तत्काळ अटक करावी असेही निर्देश दिले असून, तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
Komentarai