top of page

5 राज्याच्या निकालात भाजपची मुसंडी: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीला धक्का, तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहूमत; केरळमध्ये डाव्यांचा गड ढासळला

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे आणि महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल आणि असाममध्ये ऐतिहासिक कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रस्थापित सत्ताधार्‍यांना मतदारांनी नाकारून मोठा राजकीय बदल घडवून आणला आहे.


पश्चिम बंगालमध्ये भाजपचे ऐतिहासिक ‘महापरिवर्तन’ : पश्चिम बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदरांनी जोरदार धक्का दिला आहे. एकून 293 जागांच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक 195 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे, तर तृणमूल काँग्रेसला केवळ 92 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत डाव्या पक्षांना केवळ 2 जागा मिळाल्या असून काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही, इतर उमेदवारांनी 2 जागांवर विजय मिळवला.


तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाची मुसंडी : तामिळनाडूच्या राजकारणात प्रदिर्घ काळानंतर पारंपारिक द्राविडी पक्षांना बाजूला सारत एका नव्या पक्षाने सत्ता काबीज केली आहे. सुपरस्टार विजय यांच्या ‘ तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने 106 जागा जिंकून राज्यात नवा इतिहास रचला आहे. तर सत्ताधारी द्रमुक पक्षाला 68 आणि अण्णा द्रमुक पक्षाला 58 जागांवर विजय मिळवता आला. या ऐतिहासिक निकालामुळे द्राविडी राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.


आसाममध्ये भाजचे वर्चस्व कायम: आसाममध्ये पुन्हा एकदा मतदारांनी भाजप सरकारवर आपला विश्वास दाखवला आहे. 126 जागांच्या विधानसभेत भाजपने एकट्याने 100 जागा जिंकून सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. येथे काँग्रेसला केवळ 20 जागा जिंकता आल्या, तर इतर पक्षांना 6 जागांवर यश मिळाले.


पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीचे सत्ता कायम : केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये भाजप आणि एआईएनआरसी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 22 जागांवर विजय मिळवून सत्ता राखली आहे. येथे काँग्रेसला केवळ 6 जागांवर विजय मिळवता आला, तर 1 जागा अपक्षाच्या पदरात पडली.

पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रात पार पडलेल्या दोन अत्यंत प्रतिष्ठेच्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये महायुती उमेदवारांनी प्रचंड विजय संपान केला आहे.


बारामतीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय विक्रम : दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांनी 24 व्या फेरी अखेर 2 लाख 18 हजार 930 मतांचे प्रचंड मताधिक्य मिळवून देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा नवा इतिहास रचला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार वगळता इतर सर्व 22 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.


राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डीले यांचा लाखाच्या फरकाने विजय: आहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघात दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डीले यांनी 1 लाख 12 हजार 587 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवून वडिलांचा राजकीय गड राखला. अक्षय कर्डिले यांना मिळालेल्या या लाखांच्या मताधिक्यासमोर विरोधकांचा सुपडा साफ झाला. येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना अवघी 27 हजार 506 मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळके यांना 5 हजार 690 मते आणि अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांना 7 हजार 299 मते मिळाली.

Comments


bottom of page