आमदार फोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर; माजी मंत्र्याचा हात, तिघांना अटक

आमदार फोडण्यासाठी 35 कोटींची ऑफर; माजी मंत्र्याचा हात, तिघांना अटक
Published By: Navnath Yewale
Published On:

देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. तमिळनाडू नवनियुक्त सरकार अस्थिर करण्यासाठी घोडेबाजार षडयंत्र रचण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आमदाराला तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम या पक्षाचे आमदार एन. इलाईराजा यांनी तामिळनाडू पोलिसांत याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. विधानसभाव अध्यक्षांविरोधातील ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी आपल्याला 35 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा इलाईराजा यांनी तक्रारीत केला होता.

या षडयंत्रामागे डीएमके सरकारमधील माजी मंत्री व्ही. सेंथिल बालाजी आणि त्यांचे बंधू व्ही अशोक कुमार यांचेही नाव तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी हे षडयंत्र रचल्याचा अरोप होत आहे. इलाईराजा यांनी 29 जून रोजी ग्रेटर चेन्नई पोलिसांत या बाबत तक्रार केली होती या तक्रारीनुसार एका व्यक्तीने इंडियन पोलिटिकल डेमोक्रेटिक स्ट्रॅटेजी ही संस्था चालवत असल्याचे सांगितले होते. तसेच एका मोठ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांमार्फत आपण संपर्क करत असल्याचा दावा त्याने केला होता.

इलाईराजा यांच्या तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने त्यांना अध्यक्षांविरोधात प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली होती. त्यासाठी 35 कोटी रुपयांची ऑफर दिली. पण हे करण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकाविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर काही तासांत तिघांना अटक करण्यात आली आहे.

तीन आरोपीपैकी एका आरोपीला डीएमकेचे आमदार व्ही सेन्थिल बालाजी आणि त्यांचे बंधू भेटल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा आणखी सखोल तपास केला जात असून षडयंत्रामध्ये कोण- कोण सहभागी होते, याचा शोध घेतला जात आहे. पुढील सहा महिन्यांत सरकार कोसळणार असल्याचा दावा डीएमके प्रमुख. एम. के. स्टॅलिन यांनी सरकार स्थापनेवळी केला होता.

Related Posts