बाप जमीनदार, आई भूमिहीन...
जातीभेद आणि शोषणाचे टोकदार दुःख सोसलेल्या संयमी लेखकाची निवड
1984 मध्ये प्रकाशित झालेल्या 'अक्करमाशी'मधून शरणकुमार लिंबाळेंनी आपली भळभळती जखम शब्दबद्ध केली. आमच्या सोलापूर जिल्ह्यातील हुन्नूर गावचा त्यांचा जन्म. मराठी कानडी बहुभाषिक असणारा हा परिसर. त्यांचा जन्म महार जातीतल्या आईच्या पोटी, मसामाईच्या पोटी झालेला आणि जातीचा हा बाभूळकाटा दुहेरी होता! सवर्ण समाजातील लिंगायत जातीचे हणमंत लिंबाळे हे त्यांचे जन्मदाते. मसामाई आणि हणमंत यांच्या संबंधातुन त्यांचा जन्म. वडील जमीनदार आणि आई भूमिहीन, उपेक्षित! दोन्ही बाजूंच्या समाजाने या संबंधाला अनैतिक ठरवले आणि शरणकुमारला ‘अक्करमाशी’ म्हणून हिणवले.
‘अक्करमाशी’ ही शरणकुमार लिंबाळे यांची आत्मकथा. ‘अक्करमाशी’ म्हणजे अनौरस संतती; ज्याला वडिलांचे नाव धारण करण्याचा अधिकार लाभला नाही, ज्याला समाज मान्य करत नाही. आजही ग्रामीण महाराष्ट्रात हा शद्ब प्रचलित आहे यावरून काय ते ओळखावे. असो.
‘अक्करमाशी’ वाचताना आपण हताश होतो, दुःखाने गदगदून येतं. पानापानांतून लिंबाळेंच्या आईचा आणि पर्यायाने दलितांचा, महिलांचा आणि हक्काच्या अस्तित्वाशिवाय वाढलेल्या शरणकुमारांचा संघर्ष आपल्याला व्याकुळ करतो. मसामाईसारख्या स्त्रियांना सवर्ण पुरुषांनी लैंगिक शोषण करून पुढे समाजाने ‘रांड’ ठरवले याचा उद्वेग अस्वस्थ करवतो. लिंबाळे स्वतःला, आईच्या शोषणाचे फळ म्हणवतात! जाती आणि लिगभेदाचे हे दुहेरी शोषण त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेय.
आई मसामाईला गावातील पाटीलाने दासीसारखे वागवले. तिला ‘रांड’ म्हणून हिणवले जायचे याचे सल शरणुच्या मनात कायमचे राहतात. त्यांची आजी संतामाई आणि समाजातील इतर स्त्रियांचे जीवनही तितकेच यातनामय होते, भलेही त्यांच्या नात्यांना नावं होती तरीही त्यांचे आयुष्य कारुण्यात्मकच होतं. भूक, अपमान, जातीय भेदभाव हे लिंबाळेंच्या रोजच्या जगण्याचे भाग होते. शाळेत आणि गावात त्यांना हेतुतः ‘अक्करमाशी’ म्हणून टोमणे मारले जात. त्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच जातीय विषमतेचा सामना केला. त्याचीही कैफियत ह्या पुस्तकात आहे.
‘अक्करमाशी’ हा केवळ एका जातीचा, एका स्त्रीचा, एका आईचा आणि तिच्या मुलाचा संघर्ष नसून ज्यांचे अस्तित्व अधांतरी राहते त्यांच्या शोधयात्रेची सल आहे, जी कोणत्याही संवेदनशील माणसाला टोकरत राहते. मी कोण आहे, माझे वडील कोण आहेत, माझी जात कोणती आहे हे प्रश्न शरणकुमारना आयुष्यभर सतावत राहिले. त्याची धग आत्मकथेत टोकदारपणे जाणवते.
आपल्याकडे समाजाची उतरंड अनेक स्तरावर मांडली जाते. वर्ण, जात, गोत्र,धर्म, भाषा, प्रांत, लिंग अशा अनेक कॅटेगरीजचा आधार घेतला जातो. मात्र एक गोष्टीवर फोकस करणे चलाखीने टाळले जाते आणि ती म्हणजे कोणत्याही उतरंडीच्या तळाशी जो वर्ग असतो त्याच्याही खाली आणखी एक घटक असतो जो त्या सर्वात खालच्या वर्गातील स्त्रियांचा असतो! लिंबाळेंनी हा मुद्दा अतिशय जोरकसपणे मांडला असला तरी त्याला टिपिकल फेमिनिस्टीक शेडपासून दूर ठेवलेय.
‘अक्करमाशी’ हे आत्मकथन मराठी दलित साहित्यातील एक मैलाचा दगड मानले जाते. दया पवारांचे ‘बलुतं’, बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमुचं’ यांच्याबरोबरच या पुस्तकाने दलित आत्मकथनाची परंपरा अधिक तीव्र आणि प्रामाणिक बनवली.
लिंबाळेंचे दुःख दुधारी तलवारीसारखे आहे कारण त्यांना सवर्ण समाजातही स्थान नव्हते आणि दलित समाजातही पूर्ण स्वीकार नव्हता; ते दोन्ही बाजूंनी बहिष्कृत आहे. ही ‘अक्करमाशी’ स्थिती पुस्तकाच्या मध्यवर्ती वेदनेचे कारण आहे. बटबटीतपणाला फाटा देऊन संयत शैलीत लिंबाळे स्वतःला उलगडत जातात आणि वाचणारा सोलून निघतो.
त्यांची भाषा अत्यंत साधी, प्रवाही असली तरी तिची शैली थेट भिडणारी आहे. साहित्यिक अलंकार किंवा सुंदर वाक्यरचना येथे दुय्यम आहेत. अनुभव इतके भीषण आहेत की भाषा स्वतःच वेदनेची वाहक बनते. ही शैली दलित साहित्याच्या, अनुभवप्रामाण्याच्या तत्त्वाला पूर्ण न्याय देते.
‘अक्करमाशी'वर बरेच घमासान झाल्यावर काहींनी आक्षेप नोंदवला होता की, पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात लिंबाळेंना, शिक्षण आणि नोकरी मिळाल्यानंतरही उच्चवर्णीय स्वीकृतीची अपेक्षा ठेवल्यासारखे काही भाग आहेत. त्याचबरोबर वैयक्तिक लिंबाळेंनी जगलेली वेदना इतकी तीव्र आहे की, व्यापक सामाजिक-राजकीय विश्लेषणाकडे त्यांनी कमी फोकस केलेय. मात्र वास्तवात हेच ह्या पुस्तकाचे भक्कम गुणलक्षण आहेत, ज्यामुळे ते अधिकाधिक सच्चे झालेय.
‘अक्करमाशी’ हे फक्त एका व्यक्तीचे आत्मकथन नाहीये. जातीव्यवस्थेने निर्माण केलेल्या अमानुषतेचा तो काटेरी दस्तावेज आहे. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या वैयक्तिक वेदनेला सामूहिक वेदनेत रूपांतरित केलेय. हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक अस्वस्थ होतो, आणि ही अस्वस्थताच या कलाकृतीचे यश आहे. मराठी दलित साहित्यात या पुस्तकाने ‘मी कोण?’ हा प्रश्न नव्याने उपस्थित केला आणि तो प्रश्न आजही प्रासंगिक आहे.
'अक्करमाशी'मधील काही हृदयद्रावक प्रसंग एकदा वाचल्यानंतर विसरणे कठीण आहे. ह्या आत्मकथेची सुरुवातच एका अत्यंत वेदनादायी प्रसंगाने होते. शाळेच्या सहलीत सवर्ण मुले आपल्या डब्यातील पदार्थ खातात. उरलेले अन्न ते फेकून देतात. लहान शरणकुमार ते उष्टे खरकटे गोळा करून आपल्या फाटक्या कपड्यात बांधून घरी आणतो. घरी आजी आईसाठी ते अन्न आणणे, हा त्याच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. भुकेचे हे रौद्र रूप वाचताना कोणताही संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो.
आठवडे बाजारचा एक प्रसंग असाच अंगावर येणारा आहे. बाजार संपल्यावर केळीच्या हातगाड्यापाशी केळी खाऊन त्यांच्या साली फेकून देतात. शरणकुमारची निरागस बहीण, वानी त्या साली गोळा करून खात बसते. तो रागाने तिला मारतो आणि साली फेकून देतो. पण क्षणार्धात त्याचे मन बदलते. तो स्वतः त्या मातीत माखलेल्या साली घेऊन नदीकिनारी जातो, स्वच्छ करून खाऊ लागतो. शिक्षकांना येताना पाहून तो घाईघाईने साली फेकून देतो. हा प्रसंग अत्यंत हृदयद्रावक आहे.
ह्या पुस्तकात शरणकुमारांची आई आपल्याला शब्दशः भेटते. ती विचार करण्यास भाग पाडते. 'आई अस्पृश्य, बाप सवर्ण! आई झोपडीत, बाप माडीत. बाप जमीनदार, आई भूमिहीन. आणि मी अक्करमाशी' असा सल लिंबाळे मांडत असले तरी त्यात विद्रोहापेक्षा कारुण्य अधिक आहे!
आई मसामाईला पाटलाने दासीसारखे वागवले, गावाने तिला हिणवले ह्याविषयी लिंबाळे नेमके भाष्य करतात. ते लिहितात की, 'आईला दोन गोष्टींमध्ये अडकवले होते, भाकर आणि लैंगिक शोषण!' पोटासाठी अस्तित्व पणाला लावणाऱ्या आईचे दुःख त्यांना आयुष्यभर सतावते.
तरुण शरणकुमार शेवंता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. पण तो अक्करमाशी असल्याने ते नाते पुढे जाऊ शकत नाही. एकदा पाणी उधळताना शेवंता म्हणते, “शरण, मला भिजवू नकोस. माझ्याकडे बदलण्यासाठी दुसरे कपडे नाहीत.” हे साधे वाक्य त्याच्या मनाला तीव्र वेदना देऊन जाते.
लिंबाळेंची आजी संतामाई दारोदार फिरून जोगवा मागत असे. कधी कधी मृत जनावरांचे मांस किंवा शेणातून गोळा केलेले ज्वारीचे दाणे भाजून भाकर करून खावी लागे. भुकेपोटी अशा टोकाच्या गोष्टी कराव्या लागल्याची वर्णने अत्यंत तीव्र आहेत.
एका प्रसंगातले वर्णन अगदी भेदक आहे. खेड्यांनी गुरांनां जुंधळयाची ताटं खाऊ घातली जातात. बऱ्याचदा त्यांच्या शेणातून ज्वारीचे कण जसेच्या तसे पडतात. लहानगा शरणु शेणातली ज्वारी गोळा करण्याचे काम करत असतो. ती ज्वारी भाकरी करण्यासाठी वापरली जाते, मात्र भाकर खाताना तिला शेणकुटाचा वास येतो!
हा दर्प लिंबाळेंचा पिच्छा सोडत नाही. लिंबाळेंनी त्यामागच्या गंधभारित जगाला शब्दात पकडलंय! ती त्यांच्या आयुष्याची सल आहे, जगण्याची वीण आहे, जन्मखूण आहे आणि सरतेशेवटी त्यांच्या कारुण्याष्टकाचे मातृस्तोत्र आहे!
कदाचित यामुळेच, त्यांच्या लेखनाचा बाज विद्रोहाचा अथवा आक्रमकतेने सवाल करण्याचा नसून कारुण्यात्मकतेने ते अन्यायाचे, दुःखाचे पदर उलगडत जातात. प्रस्थापितांना थेट टक्कर देण्याची भाषा त्यांची पात्रे क्वचित करतात, विषमता आणि शोषण ह्यावर ते बोलतात मात्र त्यांनी लिपी जवळिकीची आणि क्षमेची आहे!
100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालीय ही गोष्ट निश्चितच आनंदाची आहे. त्यांच्या निवडीतून कुणी सामाजिक राजकीय संदेश शोधत असेल तर त्यात गैर नाही कारण अलीकडील काळात साहित्यक्षेत्रात अन्य कोणत्याही क्षेत्राचा हस्तक्षेप आता न्यू नॉर्मल झालाय.
जातीभेदाचे आणि शोषणाचे टोकदार दुःख सोसलेल्या संयमी लेखकाची निवड इतकाच ह्या निवडीचा अर्थ न राहता समाजात देखील समतेची बीजे खऱ्या अर्थाने खोलवर रुजली जावीत अशी अपेक्षा बाळगणे अतिरंजित ठरू नये!
100 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदरणीय शरणकुमार लिंबाळे सरांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-समीर गायकवाड
(लेखक साहित्यिक असून सामाजिक विषयांचे अभ्यासक आहेत.)