कबुतरखाना'चा वाद!,महापालिकाच जबाबदार!!
- Navnath Yewale
- Aug 8
- 2 min read

कबुतरखाना बंद करण्यावरून काल दादरमध्ये वाद निर्माण झाला. या वादातूनच आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाला कोणी हुल्लडबाजी म्हणाले! कोणी जैन समाजाला आक्रमक म्हणाले! तर कोणी याला राडा म्हणाले! अखेर प्रत्येकाचा तो वैचारिकतेचा प्रश्न आहे. काहीही असो पण कबुतरखाना बंद करण्यावरून आंदोलन निर्माण झाले आणि तसे आंदोलन होणे साहजिकच होते. या आंदोलनात महापालिकेने कबुतरखाना झाकण्यासाठी टाकलेली ताडपत्री आणि बांबूचे सुरक्षा कवच आंदोलकांनी तोडले. हे करत असताना आंदोलकांच्या हातात सुरे आणि चाकू इत्यादी हत्यारे होती.
अर्थात रस्सी आणि ताडपत्री कापण्यासाठी ती होती. या आंदोलनात पक्षीप्रेमीसह जैन समाजही मोठ्या प्रमाणात सामिल झाला होता असे आंदोलन प्रत्यक्ष पाहणाऱ्यांचे म्हणणे आहे. सुदैवाने अनुचित प्रकार घडला नाही हि या आंदोलनाची जमेची बाजू म्हणावी लागेल. परंतु कबुतरखाना समोरील जैन मंदिर ट्रस्ट आणि मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या आंदोलनाची जबाबदारी नाकारली. आधीच मराठी भाषेमुळे मुंबई परप्रांतीयांविरोधात तापलेली आहेच. ते पाहता कबुतरखानाचे आंदोलन अंगाशी शेकू नये, कदाचित याच कारणामुळे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि जैन समाजाने सावध भूमिका घेत पळ काढला असावा. वास्तविक कबुतरखानाचा वाद हा आजचा नाही. १९९० पासून हा वाद सुरु आहे. कबुतरांच्या विष्टेमुळे, अंगावरील पिसवांमुळे 'श्वसनाचे' आणि तत्सम आजार होतात. आजाराच्या या चिंतेने तेव्हाच डोके वर काढले होते.
वैद्यकीय दृष्टीने ते योग्यच होते. पण महापालिकेने दुर्लक्ष केल्याने कबुतरखाने वाढत जाऊन त्यांची संख्या ५१ च्या वर गेली. त्यामुळे कबुतरांमुळे होणाऱ्या 'श्वसनाच्या' आणि तत्सम आजाराने मुंबईत अधिक डोके वर काढले. यामुळे २०१४ नंतर मुंबई महापालिकेने कठोर धोरण राबवीत मुंबई शहरातील अनेक कबुतरखाने बंद केले. अखेर ३ जुलै रोजी कबुतरांचा प्रश्न विधानसभेत आला. कबुतरांची विष्टा आणि पिसांमुळे 'श्वसनरोगा'चा धोका वाढला असे अधोरेखित करत मुंबईतील ५१ कबुतरखाने तात्काळ बंद करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. शासनाच्या या निर्णयानुसारच दादर येथील 'कबुतरखाना'वर पालिकेने ताडपत्री टाकण्याचे काम केले.
ताडपत्री टाकल्यावर कबुतरखाना बंद झाला असे पालिकेने सांगणे म्हणजे केवळ मूर्खपणाचे नसून निर्लज्जपणाचा कळस आहे असेच म्हणावे लागेल. कारण माणसांच्या या दुनियेत कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय कोणी घेतला! का घेतला! हे बिच्चाऱ्या त्या कबुतरांना काय माहित. इतकेच त्यांना माहिती पडले की...आपले जेवण कोणीतरी अचानक बंद केले आणि आपल्याला बेघर केले. यामुळेच हि सारी हजारो कबुतरे तिथेच उडत राहिली आणि आपले अन्न पाणी शोधत राहिलीत. यात त्या कबुतरांचे काय चुकले! ते अन्नासाठी फिरणारच. यामुळे आजूबाजूच्या इमारतीत राहणाऱ्यांच्या त्रासात आणखीनच वाढ झाली. कबुतरखानावर ताडपत्री टाकण्याचा पालिकेचा निर्णय म्हणजे 'आजार परवडला, पण उपचार नको' असे स्थानिक जनतेला वाटू लागले आणि असे वाटणे साहजिकच होते. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे.
मुकी जनावरे किंवा पक्षांना पाणी आणि अन्नावाचून तडफडताना पाहणे सहिष्णूपणाचे लक्षण नाही. त्यातच जैन धर्मात कबुतरांना विशेष स्थान आहे. कबुतरांना खायला देणे हे पवित्र धार्मिक कार्य समजले जाते. त्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी जैन धर्माची धारणा आहे. अमावस्येच्या दिवशी खायला देणे विशेष महत्व असते. यात नवीन काहीच नाही. मराठी माणुसही पितृपक्षात कावळ्याला जेवायला बोलावतात. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपात येतात हि मराठी समाजात जशी धारणा आहे तशीच धारणा कबुतरांच्या बाबतीत जैन समाजात आहे. कदाचित याच गोष्टीमुळे दादर जैन मंदिरा समोर जैन समाज कबुतरांना दाणे देत गेला आणि कबुतरांची संख्या वाढत गेली. असे जरी असले तरी दादरचा कबुतरखाना उभारताना हि भावना बिलकुल नव्हती.
यासाठी ९२ वर्षे मागे जावे लागेल. १९३९ साली जेव्हा हा कबुतरखाना सुरु झाला तेव्हा तो रस्त्यावरच होता. त्यानंतर वाढत्या वाहनसंख्येमुळे कबुतरांच्या जीवाला धोका वाढत गेला. त्यातूनच समोरच असलेल्या 'जैन मंदिर ट्रस्ट' ने कबुतरांच्या सुरेक्षेसाठी एक संरक्षण कुंपण बांधण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली आणि महापालिकेने हि परवानगी दिली. त्याचाच पुढे कबुतरखाना झाला. आज वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन लागलेल्या संशोधनामुळे कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे 'श्वसनाचे' आणि तत्सम आजार पसरत असल्याचे समोर आले. त्यातूनच मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय झाला.
कबुतरखाना बंद करणे म्हणजे ताडपत्री घालून कबुतरांना मारणे असे होत नाही. ती निर्जीव वस्तू नाही. तिथे जीव असलेले पक्षी राहतात. पण.. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताडपत्री घालण्याचे अघोरी कृत्य केले. त्यामुळेच पक्षी प्रेमीचा संताप अनावर झाला आणि जैन समाजाची साथही मिळाली. त्यातूनच आंदोलन उभे राहून तणाव निर्माण झाला. वास्तविक निष्पाप असलेल्या या कबुतरांसाठी पालिकेने बोरिवली किंवा आसपासच्या जंगलात प्रथम कबुतरखाना तयार करायला हवा होता. त्यानंतरच कबुतरांना अलगदपणे पिंजऱ्यात बंद करून तेथे सोडता आले असते.
एकदा जंगलातील कबुतरखान्यात हि सारी कबुतरे दाखल झाली असती तर आपसूकच जंगलातील प्राणी, पक्षी यांचा साखळीचा एक हिस्सा बनली असती.आणि त्यातून त्यांचीही संख्या आपसूकच कमी झाली असती. जी ताकतवान कबुतरे असतील ती राहतील आणि आपला वंश वाढवतील. ज्यांना दाणे द्यायचे असतील ते जंगलातील या कबुतरखान्यात पोहचतील. शेवटी प्रत्येकाच्या भावना महत्वाच्या आहेत. पण महापालिकेने भावना जपण्यासारखे असे काहीच केले नाही. तिथेच सारे गणित बिघडले आणि वाद निर्माण झाला. आणि पक्षीप्रेमीच्या माध्यमातून जैन समाजाला मुंबईत ताकत दाखविण्याची संधी मिळाली. किंबहुना महापालिकेच्या बिनअकलेच्या अधिकाऱ्यांमुळे हि संधी मिळाली असेच म्हणावे लागेल.
सुरेंद्र इंदिरा गंगाराम मुळीक
संपादक, वृत्तमानस, मुंबई.
शुक्रवार दि.०८ ऑगस्ट २०२५
दूरध्वनी : ८९२८०५५९२७*



Comments