डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
Published By: Navnath Yewale
Published On:

अनंत गर्जेच्या घरासमोरच गौरीवर अंत्यसंस्कार, दोन्ही बाजुकडून शाब्दीक बाचाबाची

राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. गौरी यांच्या कुटुंबीयांच्या आरोपारून अनंत गर्जे यांच्या विरोधात वरळी पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अनंत गर्जे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 27 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनंत गर्जेंची पत्नी डॉ. गौरी हिने मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर गौरीच्या कुटुंबींयांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले. त्यामुळे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अनंत गर्जेवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती.

अनंत गर्जे यास रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यास वरळी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, अनंत गर्जेंवर पत्नी गौरी पालवे-गर्जे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोर्टाने अनंत गर्जेना 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या चार दिवसाच्या पोलिस कोठडीच्या चौकशीतून पोलिसांना काय नवी माहिती मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी थेट मुंबईतील वरळी पोलिस ठाणे गाठले आणि अनंत गर्जेंसह त्याच्या कुटुंबीयांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते पालिस ठाण्यातून हलण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला.

अनंत गर्जेच्या घरासमोर अंत्यसंस्कार : गौरीच्या संतप्त कुटुंबीयांनी तिचा मृतदेह अनंत गर्जेच्या मूळ गाव असलेल्या मोहोज देवढे (ता. पाथर्डी जि.अहिल्यानगर) येथे नेला . तेथे अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. या अंत्यसंस्कारावेळी दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये ृबाचाबाची झाली. आत्महत्येपूर्वी गौरी आणि अनंत गर्जे यांच्यात भांडण झाले होते, त्यानंतर अनंत गर्जे कार्यक्रमासाठी बाहेर पडले होते. घरी परतल्यावर त्यांनी गौरीला मृत अवस्थेत पाहिले. अंजली दमानिया यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित करत गौरीला न्याय मिळण्याची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.