परिसीमन न्यायीक हवे,स्वार्थी व्यवस्था नको- भुपेंद्र गणवीर
▪️देशात मतदार संघांच्या परिसीमनचा वाद आहे. वोटचोरी, एसआरआयने चेहरे डागाळले आहेत. तरी पडद्याआड पुन्हा सरकारचा परीसीमनचा घाट आहे. खासदारांची जुळवाजूळव आहे. भाव वधारले आहेत. बोली चालू आहे. ही लोकशाही की तिचे धिंडवडे असा प्रश्न आहे? आता राजस्थानचेच बघा. सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत परिसीमन आणले. अनेक सर्कलची फोडाफोड केली. तिथे सत्ताधारी भाजपच्या हाती काय लागले. पराभव पदरी पडला. इतका दारूण पराभव झाला. या अगोदर असा कधी झाला नाही.अन् कॉंग्रेसचा असा कधी विजय झाला नाही. कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले. आता लोकसभा मतदार संघ ८५० करणार. याचा अर्थ नव्या वाढीव खासदाराचे वेतन, भत्ते आले. त्याचा भूर्दड सरकारी तिजोरीवर टाकणार. त्यापेक्षा सध्या आहेत. त्या जागेत महिला आरक्षण लावा. महिलांच्या आड राजकीय स्वार्थ का ? असा प्रश्न पडतो.
मतदार हा सत्तेचा गुलाम नाही. त्याला सत्ताधाऱ्यांनी आपल्या स्वार्थासाठी हाकावे. त्यांच्या मर्जी विरूध्द वागावे. मतदार संघात त्याचेही हित असते. संगे-सोयरे असतात. सबंध असतात. ते अचानक तोडणे. दुसरीकडे जोडणे. त्याचा परिणाम केवळ लोकसभा मतदार संघापुरता होत नसतो. तो विधानसभा, पंचायत समिती सर्कल, वॉर्डापर्यंत पडतो. म्हणजे केवळ मतदारच दुखावत नाही. एक संपूर्ण साखळी दुखावते. जेव्हा परिसीमन वादाच्या भोवऱ्यात अडकते. तेव्हा सत्ताधाऱ्यांबाबत संशय वाढते. मग तुम्ही त्याला महिला आरक्षण म्हणा किंवा अन्य कोणतेही गोडस नाव द्या. सत्ताधाऱ्यांनी अमृतकाळ संबोधले. अच्चे दिन आनेवाले है चे गाजर दाखविले. अन् सरकारी नोकऱ्यांचे खासगीकरण केले. महागाई वाढविली. रूपया घसरला. पेट्रोलमध्ये इथेनॉलची भेसळ केली. तरी किंमत घटविली नाही. पेट्रोलने शंभरीपार केली. योजनांना लोभस नाव द्या. त्या आड लोकांना लुबाडा. पीक विमा योजना आणली. नाव शेतकऱ्यांचा, लाभ कंपन्यांचा. पथकर आणले. वाहनधारकांची लूट, ठेकेदारांची तिजोरी फुल्ल. ही सोय लोकांची नाही. त्या आड सत्ताधारी पक्षांच्या राजकीय फंडाची सोय असते. हे निवडणूक रोख्यांतून सर्वांना कळून चुकले.
मतदार संघाची सीमा बदलणे. म्हणजे केवळ नकाशा बदलने नाही. त्यातून संपूर्ण सामाजिक आणि राजकीय साखळी विस्कळीत होते.संसद आणि विधान सभांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा. ही काळाची गरज आहे. मात्र चर्चा महिला आरक्षणाची आणि डाव परिसीमनाचा नको. त्यावर प्रश्न विचारले जावे. लोकांचे समाधान व्हावे. सध्या लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात ९७ कोटी ९७ लाखांहून अधिक मतदार होते. त्यामध्ये ५०.३४ कोटी पुरुष, ४७.६३ कोटी महिला मतदार होत्या. म्हणजेच महिला मतदारांची संख्या जवळपास ४८ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यांना 33 टक्केच आरक्षण कां? ४८ टक्के कां नको? सरकार ३३ टक्के आरक्षण म्हणते. सध्याच्या ५४३ जागांवर हे प्रमाण लागू झाले. तर साधारण १८१ जागा महिलांसाठी राखीव होतील. २०२३ च्या घटना दुरुस्तीने पहिल्या जनगणनेची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर हे आरक्षण लागू होणार. त्यात परिसीमनाची अट कशासाठी ? एप्रिल २०२६ मध्ये केंद्र सरकारने यासाठी घटनादुरुस्ती आणि परिसीमनाशी संबंधित विधेयके आणली. लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० करण्याचा प्रस्ताव होता. सध्याच्या ५४३ जागांमध्ये ५० टक्के वाढ केल्यास लोकसभेच्या जागा साधारण ८१५ होतील.८१५ जागांपैकी ३३ टक्के आरक्षण लागू झाले तर जवळपास २७२ जागा महिलांसाठी राखीव होतील. १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत आवश्यक दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने १३१ वी घटनादुरुस्ती व संबंधित विधेयके अडकली. त्यामुळे ८५० जागांचा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू झालेला नाही. महिलांना आरक्षण द्यावयाचे आहे. तर सध्याच्या मतदार संघांची रचना कायम ठेवून महिलांना आरक्षण देण्याचे पर्याय का तपासले जात नाहीत? महिलांना आरक्षण देण्याचा मार्ग मतदारसंघांची पुनर्रचना आणि राजकीय उलथापालथ यांच्याशीच का जोडला जातो?
परिसीमनाचा मूळ उद्देश लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वात समतोल राखणे हा आहे. मात्र, भारतासारख्या संघराज्य व्यवस्थेत हा विषय अधिक गुंतागुंतीचा आहे. काही राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात यश मिळविले. शिक्षण, आरोग्य आणि कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात प्रगती केली. दुसरीकडे काही राज्यांमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग अधिक राहिला. केवळ लोकसंख्येच्या आधारावर जागांचे पुनर्वाटप झाले, तर लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी झालेल्या राज्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होण्याची भीती आहे.२०२६ च्या प्रस्तावित विधेयकात २०११ च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन करण्याचा मार्ग खुला केला होता. पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या विश्लेषणानुसार, त्या पद्धतीने काही राज्यांच्या जागा वाढल्या असत्या, तर काहींच्या कमी झाल्या असत्या. तामिळनाडूच्या जागा ३९ वरून ३२ आणि केरळच्या २० वरून १५ होण्याची शक्यता दर्शविण्यात आली होती. उत्तर प्रदेशच्या जागा ८० वरून ८९ आणि बिहारच्या ४० वरून ४६ होण्याचा अंदाज होता. हे आकडे प्रस्तावित गणिताचे होते. अंतिम परिसीमनाचे नव्हते. म्हणूनच परिसीमन करताना केवळ लोकसंख्या नव्हे, तर संघराज्यीय समतोल, लोकसंख्या नियंत्रणातील राज्यांचे योगदान आणि प्रादेशिक प्रतिनिधित्व या बाबींचाही विचार झाला पाहिजे. मतदारसंघ बदलतात, तेव्हा केवळ नकाशा बदलत नाही! आज एखाद्या मतदार संघातील गाव दुसऱ्या मतदारसंघाला जोडले जाते. तेव्हा मतदाराला विचारले जाते का, की तुमच्या गावाचा मतदारसंघ बदलावा कां...? नागरिकांच्या हरकतींना किती महत्त्व दिले जाणार? या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.
गेल्या काही वर्षांत निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदारयाद्यांमधील दुरुस्त्या, विशेष सखोल पुनरीक्षण आणि मतदारांच्या हक्कांबाबत देशात चर्चा झाली. मतदारयाद्यांच्या पुनरीक्षणाला विरोध करण्यामागे राजकीय पक्षांनी वेगवेगळी कारणे मांडली आहेत. अशा वातावरणात परिसीमनासारखा मोठा निर्णय घेताना अधिक पारदर्शकता अपेक्षित आहे. लोकसभेच्या जागा वाढविणे म्हणजे केवळ प्रतिनिधित्व वाढविणे नाही. त्यासोबत खासदारांचे वेतन, भत्ते, कार्यालयीन खर्च, कर्मचारी, संसदीय व्यवस्था आणि सरकारी खर्चही वाढणार आहे. मंत्रिमंडळाच्या आकारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त खर्चाच्या तुलनेत लोकांना किती प्रभावी प्रतिनिधित्व मिळणार, याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. परिसीमनासाठी स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वासार्ह प्रक्रिया असली पाहिजे. आयोगाची नियुक्ती, लोकसंख्येचा आधार, जागांचे वाटप, मतदारसंघांच्या सीमा आणि नागरिकांच्या हरकती याबाबत स्पष्ट निकष असावेत. आयोगाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता असावी. सर्व राजकीय पक्ष, राज्ये आणि नागरिकांना आपली बाजू मांडण्याची समान संधी मिळाली पाहिजे. मतदारसंघांच्या रचनेत राजकीय सोय किंवा पक्षीय लाभाला स्थान असता कामा नये.
महिलांना संसदेत ३३ टक्के प्रतिनिधित्व मिळणे हा केवळ कायद्याचा विषय नाही; तो सामाजिक परिवर्तनाचा विषय आहे. ग्रामीण भागातील महिला, शेतकरी महिला, कष्टकरी महिला, दलित, आदिवासी आणि वंचित समाजातील महिलांनाही नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे. आरक्षणाचा लाभ काही मोजक्या राजकीय घराण्यांपुरता मर्यादित राहता कामा नये. लोकशाहीत जागांची संख्या वाढविण्यापेक्षा प्रतिनिधित्वाचा दर्जा वाढविणे अधिक महत्त्वाचे आहे. मतदारसंघांच्या सीमा बदलण्यापूर्वी मतदारांचा विश्वास जिंकला पाहिजे. महिला आरक्षण ही लोकशाहीची गरज आहे. पण परिसीमनाच्या नावाखाली मतदारांच्या अधिकारांशी खेळणे ही लोकशाहीची गरज नाही. महिलांना सन्मान हवा, मतदारांना न्याय हवा आणि राज्यांना प्रतिनिधित्वाचा समतोल हवा. या तिन्ही गोष्टी एकत्र साधता येतात. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि निष्पक्ष दृष्टिकोन आवश्यक आहे. महिलांच्या नावाने मतदारसंघांची फाळणी नको. लोकशाहीच्या हितासाठी न्याय्य परिसीमन हवे!