...अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल - करूणा मुंडे

...अन्यथा आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल - करूणा मुंडे
Published By: Navnath Yewale
Published On:

नाशिक: नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभरात चांगलाच गाजत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनात असलेले 1700 वर वृक्ष तोडण्यात येणार आहेत. मात्र याला पर्यावरणप्रेमी आणि विविध समाजिक संस्थांकडून जोरदार विरोध होत आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील या मोहिमेला पाठिंबा देत वृक्षतोडीला विरोध केला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापलं आहे, या प्रकरणात अंजली दमानिया यांच्यानंतर आता करुणा मुंडे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी तपोवनला भेट दिली. आम्ही या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करतो, धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका. साधू-संतांना सिमेंट - काँक्रीटमध्ये बांधून ठेवू नका. तपस्या भंग करू नका. निसर्गाशी खेळलात तर भोग भोगावे लागतील, असं यावेळी करूणा मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, आज मी तपोवनला आले आहे, झाडे कापण्याचे दुष्कर्म सुरू आहे. संत तुकाराम महाराज म्हणायचे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे,पण देवा भाऊंचे सगेसोयरे आदानी- अंबानी आहेत, पण त्यासाठी वृक्ष कापून मार्ग मोकळा करायचा का? असा टोला यावेळी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना लगावला आहे. आम्ही या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करतो, शंकराचार्यांनही सांगितले वृक्ष कापण्याची गरज नाही. एक वृक्ष कापला तर आमचा एक-एक पदाधिकारी आत्मदहन करेल असा इशाराच यावेळी करूणा मुंडे यांनी दिला आहे.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वृक्ष आमचे नातेवाईक. आपले शरीर पाच तत्वांपासून बनले आहे, निसर्गाशी नाते घट्ट आहे. निसर्गाला धक्का लावू नका. राजकारणी लोक राजकारण करतीलच. हा मुद्दा हिंदू- अहिंदू किंवा धर्माचा नाही, हा निसर्गाचा प्रश्न आहे. त्यासाठी ट्विट करायची गरज नाही, कृती करा. झाडे कापण्याचा प्रयत्न म्हणजे खून करण्याचा प्रयत्न. झाडे कापण्याचे पाप करू नका. नाहीतर आमचा एक एक पदाधिकारी आत्मदहन करेल. असं यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या.