कॅनाडातील जी 7 परिषद अर्धवट सोडून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला रवाना

कॅनाडातील जी 7 परिषद अर्धवट सोडून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला रवाना
Published By: Navnath Yewale
Published On:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा येथे सुरू असलेल्या जी 7 शिखर परिषद अर्ध्यातूनच सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेला परतले आहेत. मध्य पूर्वेतील (मिडिल ईस्ट) वाढता तणाव, विशेषत: इराण आणि इस्त्रायल यांच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर, त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडियावर तेहरानमधील नागरिकांना शहर रिकामे करण्याचा इशारा दिला होता. यावरून अमेरिका या मुद्यावर अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, व्हाईट हाऊसने सोमवारी एक निवेदन जारी करत राष्ट्रध्यक्ष ट्रम्प काही महत्वाच्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अमेरिकेत परतले असल्याचे म्हटले आहे. यामुळे अमरिका या यद्धात प्रत्यक्षपणे उतरण्याच्या तयारीत तर नाही ना? तसेच, असे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत, ज्यांसाठी ट्रम्प यांनी जी 7 शिखर परिषद अर्ध्यावरच सोडून परतण्याचे ठरवले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इस्त्रायलचे समर्थन केले आहे. मात्र, थेट युद्धात भाग घेण्यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कसल्याही प्रकारची औपचारिक घोषणा केलेली नाही. यामुळे, ट्रम्प यांचा हा निर्णय गंभीर संकेत देत आहे.

इराणवर एकट्या इस्त्रायलने हल्ले केले आहेत. या कारवाईत अमेरिकेचा कुठलाही थेट हात नाही. यावेळी अमेरिकेचे प्राधान्य मध्य पूर्वेत तैनात असलेल्या आपल्या सैनिकांची सुरक्षितता निश्चित करणे आहे, असे अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी नुकतेच म्हटले होते.

तत्पूर्वी जी-7 शिखर परिषदेतील नेत्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, इस्त्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नागरिकांचे संरक्षणही महत्वाचे आहे. इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे एक मुख्य कारण आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, यावर आम्ही ठाम आहोत.

Tags:

Related Posts