top of page

ऑनर किलिंग: प्रेमविवाहाचा राग; सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकार्‍याने मुलीसह जवायावर झाडल्या गोळ्या .



वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचे वडिल किरण मंगले यांना मान्य नव्हता, त्याचाच राग मनात धरुन बहिणीच्या विवाहासाठी उपस्थित असलेल्या मुलीसह जावायावर किरण मंगले यांनी गोळ्या झाडल्या. दरम्यान, लग्नसाहेळ्यात घुसून किरण मंगले यांनी केलेल्या गोळीबारामध्ये तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर जावाई गंभीर जखमी झाला आहे.


जळगाव जिल्ह्यात चोपडा शहर ऑनर किलिंगच्या घटनेनं हादरलं आहे.

या घटनेत तृत्पी वाघ (वय 24) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती अविनाश वाघ यांच्या पाठीत गोळी शिरल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण वर्षभरापूर्वी तृप्ती हिने अविनाश वाघ यांच्याशी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचे वडिल किरण मंगले यांना मान्य नव्हता. विवाहनंतर हे दाम्पत्य पुण्यात राहत होतं. अविनाशच्या बहिणीच्या लग्नासाठी दोघेही शनिवारी जळगावच्या चोपडा शहरात आले होते. दरम्यान, तृप्ती आणि अविनाश आल्याच्या माहितीवरुन किरण मंगले चोपड्यात आणि थेट लग्नस्थळी पोहोचून तृप्ती आणि अविनाशवर त्यांनी गोळ्या झाडल्या. गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला तर अविनाश गंभीर जखमी झाला आहे.


तृप्तीचे वडिल किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत.त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करून हा गोळीबार केल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर लग्नात आलेल्या वर्‍हाडींनी गोळीबार करणार्‍या अर्जुन मंगले यांना चोप दिला. त्यात तेही गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून किरण मंगले यांनी गुन्ह्यात वापरलेला पिस्टल जप्त केला. जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती दिली. तृप्तीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रात्री उशीरा उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला. तसेच गंभीर जखमी असलेल्या अविनाश आणि किरण या दोघांना जळगाव येथे हलविण्यात आलं.


या घटनेमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे.तसेच वाघ यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत. त्यात धरणगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नसल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामन्य नागरिकांतून उमटत आहेत.

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page