कासा येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
- Navnath Yewale
- Aug 12, 2025
- 1 min read
पारंपारिक वेशभुषा, रॅली, सांस्कृतिक कार्यक्रमाने भारवले नागरिक; परिसरातील शेकडो बांधवांचा सहभाग

डहाणू : पालघर जिल्हा हा राज्यातील प्रमुख आदिवासी बहुल जिल्हा असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील कासा, तवा, डहाणू, वानगाव, बोईसर, मनोर, पालघर, तलासरी, जव्हार, विक्रमगड आदी भागातून हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत, ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत्या पारंपरिक वाद्यांसह रॅलीत सहभागी झाले.
कासा येथे कासा उत्सव समितीच्या वतीने सकाळी चारोटीहून गाजत-गाजत रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत सहभागी झालेल्या महिलांनी व पुरुषांनी पारंपरिक नृत्य आणि गाणी सादर करत सामाजिक ऐक्याचा आणि आदिवासी संस्कृतीचा संदेश दिला. रॅलीचा समारोप कासा-सायवान येथील बिरसा मुंडा चौकात झाला. येथे आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला श्रीफळ अर्पण करून व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यानंतर कासा केंद्र कन्या छात्रालय येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अजय तुंबडा यांनी प्रस्तावना सादर करत बिरसा मुंडा, माजी खासदार चिंतामण वनगा, माजी आमदार कै. कृष्णा घोडा आणि कै. डॉ. डगला यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यंदाच्या जागतिक आदिवासी दिनाची थीम होती "आत्मनिर्णयाचा अधिकार, अन्न सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचा मार्ग".
अधिवक्ता अँड. विराज गडग यांनी आदिवासी हक्क, संस्कृती आणि आदिवासी जमिनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची सविस्तर माहिती समुदायाला दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांनी अन्न सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले, तर समाजकल्याण सभापती पांडुरंग बेलकर यांनी जागतिक आदिवासी दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व विषद केले.
कार्यक्रमात आदिवासी समाजातील गरोदर महिलांची प्रसूती सेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या माल्ही घाटाळ यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.या प्रसंगी आदिवासी एकता सेवा संस्थाचे सुरेश पाडवी, उत्सव समितीचे अजय तुंबडा, दिनेश भोईर, रामा गोवारी, रोहित शेलार, अनिल धांगडा, गणेश धोडी, ग्रामपंचायत सदस्य सुदाम कदम, प्रहार संघटनाचे डहाणू सचिव जितेश पाचलकर, सामाजिक कार्यकर्ते अजय मेढा, अविनाश सोमण, आकाश वावरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल आदिवासी पत्रकार संघटनेचे निलेश कासट यांनी केले.तसेच मोठ्या संख्येने उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचा शेवट पारंपरिक नृत्य आणि गीतांनी झाला, ज्यातून आदिवासी समाजाच्या एकतेचा, सांस्कृतिक अभिमानाचा आणि हक्कासाठीच्या लढ्याचा संदेश देण्यात आला.



Comments