नवले पुलावर कंटेनरने अनेक वाहनांना उडवले, आगीच्या भक्ष्यात दुर्घनाग्रस्त वाहनं; आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- Navnath Yewale
- Nov 13, 2025
- 1 min read

पुणे : पुण्यातील नवले पुलावर आज भयंकर अपघाताची घटना घडली. नवले पुलावर भरधाव कंटेनरने 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर पेट घेतला. यावेळी दुर्घटनाग्रस्त वाहनांना देखील आग लागली. या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे- बंगळुरू महामार्गावर अपघाताची ही भयंकर घटना घडली.
या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नवले पुलावर काचांचा ढीग, पेटलेली वाहनं, कारचा चुराडा झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सध्या पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलावर आज संध्याकाळी भीषण अपघात घडला.एका भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना धडक देत एका ट्रकला धडक दिली. कंटेनरने कार, दुचाकी आणि ट्रक अशा 10 ते 12 वाहनांना धडक दिली. या अपघातामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतां पैकी कित्तेकांचा आगीमध्ये होरपळून अक्षरश: कोळसा झाला.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, साताराहून पुण्याच्या दिशेने हा कंटेनर येत होता. नवले पुलावरून खाली उतरत असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या कंटेनरने समोर येईल त्या वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे रस्त्यावर काचांचा ढिग पडला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.



Comments