भाजपच्या बड्या नेत्याच्या निकटवर्तीयाचा ‘हनी ट्रॅप’ कांड
- Navnath Yewale
- Jul 21
- 1 min read
प्रफुल्ल लोढा जामनेरचा भाजप पदाधिकारी ; महाजन, खडसे वाद पेटणार!

बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणासह अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तील भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. लोढा हा मंत्री गिरिश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी केला. त्यामुळे खडसे- महाजन यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
नोकरीचे अमिष दाखवून एका 16 वर्षीय मुलीसह तिच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा मुंबई अंधेरी एमआडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा याच्यावर दाखल करण्यात आला आहे. मुलींची अश्लील छायाचित्रे काढून, त्यांना डांबून ठेवून धमकावल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. पोस्कोसह बलात्कार, खंडणी आणि हनी टॅपचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जूलै रोजी प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आली होती.
प्रफुल्ल लोढाने दिलेली काही आक्षेपार्ह छायाचित्रे आपण भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी गंभीर दखल घेऊन संतापही व्यक्त केला होता. मात्र, मधल्या काळात ही छायाचित्रे गायब झाली.
लोढा यांच्याकडील आक्षेपार्ह साहित्य भाजपच्या एका बड्या नेत्याला अडचणीत आणू शकते. त्यामुळे पोलिसांनी योग्य चौकशी केली पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.
कट्टर विरोधक ते विश्वासू
प्रफुल्ल लोढाच्या गुन्ह्यांचा तपास करताना मुंबई पोलिसांनी त्याच्या जामनेर आणि पहूर येथील मालमत्तेची तपासणी केली. त्याचे लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याच्याकडे आणखी काही सीडी मिळतात का, याचा शोध पोलिस घेत आहेत. एके काळी महाजन यांचा कट्टर विरोधक असणारा लोढा मधल्या काळात त्यांचा विश्वासू बनला, असा दावाही खडसे यांनी केला आहे.



Comments