top of page

मराठा आरक्षणाला विरोध करणारे तुमच्या ऑफिसला कसे, मी तुमचे 15 ते 20 आमदारं सहज पाडू शकतो- जरांगे पाटील, मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप

जालना: भुमरेमामा तुम्ही सहाव्या नंबरवर होता तुम्हाला निवडून आणण्यासाठी मराठ्यांच्या पारांनी काम केलं. पण तुम्ही आमचाच मामा करायला निघाला. तुम्ही मराठ्यांचं नुकसान करणार असाल तर शिंदेच्या सगळ्या सीट आम्ही पाडणार, शिंदे साहेबांचे इतके सीटं पाडणार की त्यांना आयुष्यात पश्चात होईल, झोपून टाकील मी सगळे सीट. एकनाथ शिंदे आपण जीवाभावाचे आहात. त्यातून आम्ही तुमचं काम करत होतो. पण तुम्ही माझ्याचविरोधात फिरलात. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण तुम्ही धोका दिला. असा घणाघाती आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.


मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला झाला. मात्र आता त्याच प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलं आहे. मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवलेल्या चार मराठा महिला लोकप्रतिनिधींची जात वैधता पडताळणी समितीने रद्द केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत सरकारवर घणाघात करत गंभीर आरोप केले.

शरद पवार साहेब म्हातारे झाले आहेत. त्यामुळे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना मराठे तुटून मतदान करत होते. शिंदे साहेब तुम्ही उपकराची परतफेड कराल असं वाटलं होतं, आम्ही झोकून काम केलं. निवडणुकीला तुमच्याकडून कुणी पैसे घेतले असतील तर दाखवून द्या, फडणवीस साहेब मराठ्यांच्या जीवावर सत्तेत बसले आहेत. त्यामुळे संगळं बाहेर काढायला लावू नका, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. एकनाथ शिंदेंसाठी आम्ही खूप खस्ता खाल्यात, पण तुम्ही आमची नरडी कापायला लागलात. तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो. पण तुम्ही सत्तेत गेलात म्हणून आमच्यावर माज उतरवणार का? शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळतात का? आता उद्धव ठाकरे बरा म्हणायची वेळ आली म्हणत जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावलं.


चंद्रशेखर बावनकुळेंच्या सांगण्यावरून मराठ्यांची प्रमाणपत्र रद्द करत आहेत. बावनकुळे इतके मोठे झाले का? फडणवीसांनी बावनकुळेंना एवढे अधिकार दिले का? फडणवीस तुम्ही उगाच मराठ्यांना अंगावर घेतलंय अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी यावेळी केली. शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पाडू शकतो, 25,30 तुमचे आणि बावनकुळेमुळे फडणवीसांचे 25,30 आमदार घालवू शकतो. शिंदे साहेब मराठ्यांचा घात करायचा नाही, असा सज्जड इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.


पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, प्रसाद लाड मरमर करत आहे. मात्र यांनी वाटोळं करायचं ठरवलं असेल तर ते काय करतील. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मी तीनदा- चारदा सांगितले आहे. उदय सामंत साहेबांनाही सांगितलयं, मग फडणवीस यांचा हा डाव आहे का? त्यांना बावनकुळे ऐकत नाहीत का? फडणवीस साहेब डोक्यातील हवा काढा. आमचा हैद्राबाद गॅझेटचा जीआर बोगस आहे, तर 1996 चा देखील बोगसच असल्याचे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला सज्जड इशारा दिला.


कुठलेही मंत्री असे करणार नाहीत- मुख्यमंत्री फडणवीस

प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे जातात तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम केले जाते, यामध्ये राज्य सरकारचा कुठलाही हस्तक्षेप नाही. जात पडताळणी समिती सर्वोच्च न्यायाचया निर्णयानुसारच काम करते. आता कुणबी प्रमाणपत्र किती रद्द केली, याची मला माहिती नाही. पण मी सांगू शकतो की, मोठ्याप्रमाणात त्यांच्याकडे वेगवेगळी प्रमाणपत्र येतात, त्यामध्ये 10-12 टक्के रिजेक्शन रेट आहेच त्यांचा. त्यांच्याकडे जी नॉन कुणबी ओबीसी प्रमाणपत्र येतात त्यामध्येही 10 टक्के काहीवेळा 25 टक्के रिजेक्ट होतात. त्यामुळे जाणीवपूर्वक ते कोणी रिजेक्ट करत आहे, असे होत नाही. तरीही यासंदर्भात कोणाचा काही आक्षेप असेल तर तो बघितला जाईल. जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते यामध्ये लक्ष घालतील. योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही, हे आपल्याला बघता येते. यामध्ये अपीलही करणे शक्य आहे.


आम्ही सत्तेत आहोत. पण भाजपच्याही अनेक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांची प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केली आहेत. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसतो. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार हे काम होते. मी निश्चिपणे सांगतो, कुठलेही मंत्री असे करणार नाहीत. अन्याय झाला असेल असे वाटत असेल तर अपील करू शकतात. जात पडताळणी समितीने काढलेल्या त्रुटींची पूर्तता करता येते

bottom of page