महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली; घरे शेतजमिनी, रस्त्यांना तडे
- Navnath Yewale
- 1 day ago
- 1 min read

सातारा: महाबळेश्वर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वरजवळील नावली गावात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खचण्यास सुरूवात झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे गावातील शेतजमिनी, घरे आणि अंतर्गत रस्त्यांना मोठमोठे तडे गेले असून, संपूर्ण गावात भीतीचे आणि घराटीचे वातावरण पसरले आहे.
सतत होणार्या मुसळधार आणि संततधार पावसामुळे जमिनीची पकड पूर्णपणे कमकुवत झाली आहे. परिणामी, गावातील अनेक भागांतील भूभाग अचानक खचला असून काही घरांच्या भिंतींना आणि पायाला गंभीर तडे गेले आहेत. याशिवाय, शेतजमिनींचेही मोठे नुकसान झाले असून रस्त्यांवर जागोजागी मोठ्यवा भेगा पडल्याने अंतर्गत वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, गावातील पाण्याची उंच टाकी ज्या जागी उभी आहे तो ती जागाही खचल्याने ही टाकी आता धोकादायक स्थितीत आहे. जमीन आणखी खचल्यास ही पाण्याची टाकी कधीही कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जर ही टाकी कोसळली, तर तिच्या खालच्या बाजूला असलेल्या घरांना आणि वस्त्यांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तातडीने नावली गावात दाखल झाले आहेत. सध्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी सुरू असून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला जात आहे. कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना हाती घेतल्या आहेत. गरज भासल्यास अतिधोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान महाबळेश्वर परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे आणखी जमीन खचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, तसेच धोकदायक इमारती किंवा भागात जाणे पूर्णपणे टाळावे, असे अवाहन करण्यात आले आहे. सध्या स्थानिक यंत्रणा परिस्थितीवर 24 तास लक्ष ठेवून असून पुढील काही तास गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत.



Comments