top of page

लाड भाऊ तुमच्या हस्ते पाणी पितो, जीआर काढा, उद्या प्रमाणपत्रं द्या; मगच उपोषण सोडणार!- जरांगे पाटील

जालना : मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेलं सरकारचं शिष्ठमंडळ संभाजीनगरमध्ये बुधवारी (दि.2) शिष्ठमंडळाच्या संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आमदार प्रसाद लाड रात्री उशीरा जरांगे पाटील यांच्या भेटीला आंतरवालीत दाखल झाले. सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या सकारात्मक निर्णयासह मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे माझ्या हास्ते एक ग्लास पाणी घ्या, उद्या मंत्र्यांना घेवून येतो असं म्हणत जरांगे पाटील यांना प्रसाद लाड यांनी एक ग्लास पाणी दिले. मात्र, मागण्यांवर ठाम जरांगे पाटील म्हणाले पाणी पितो पण उपोषण सुटणार नाही. जीआर काढा, प्रमाणपत्र द्या मगच उपोषण सोडणार.


मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेलं सरकारचं शिष्ठमंडळ मंगळवार (दि.1) पासून संभाजीनगरमध्ये तळ ठोकून आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस. प्रकृती खालवल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. धुळे- सोलापूर महामार्गावर दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. सकाळी वडीगोद्री येथे तर सायंकाळी महाकाळा (अंकुशनगर) येथे मराठा आंदोलनकांनी धुळे- सोलापूर महामार्गावर रास्तारोको केला. मराठा आंदोलकांच्या अचानक रास्तारोकोमुळे सकाळी दोन तास तर सायंकाळी तब्बल तीन तास महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.


जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने शिष्टमंडळाने तात्काळ आंतरवालीत जरांगे पाटील यांची भेट घेवून तोडगा काढावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे आंदोलकांची समजूत काढत असतानाच आमदार प्रसाद लाड यांचा त्यांना फोन आला. काळकुटे आणि लाड यांच्यातील संवाद आंदोलकांना माईकवर ऐकावयास दिल्याने सायंकाळी अंकुशनगर येथील रास्तारोको मागे घेण्यात आला. दरम्यान आमदार प्रसाद लाड हे आंतरवालीत जरांगे यांच्या भेटीसाठी येत असल्याचा संवाद काळकुटे यांच्यासोबत झाला होता.


त्यांनुसार आमदार प्रसाद लाड रात्री उशीरा आंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाले. सरकारकडून मागण्यांची दखल घेण्यात आली आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या सर्व मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं सांगत माझ्या हास्ते एक ग्लास पाणी घ्या, मी उद्या मंत्र्यांना घेवून येतो असं प्रसाद लाड म्हणाले. आदार लाड यांच्या विनंंतीला मान देत जरांगे पाटील यांनी सातारा, कोल्हापूर गॅझेटचा जीआर काढा, हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र वाटप सुरू करा मगच उपोषण सोडणार या अटीवर प्रसाद लाड यांच्या हस्ते एक ग्लास पाणी घेतले.

Comments


bottom of page