top of page

विरोध झुगारुन सुधाकर बडगुजर यांचा भाजपात प्रवेश


शिवसेना (उबाठा) मधून हाकलपट्टी केलेले सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आज अखेर त्याच्या प्रवेशाने पूर्ण विराम मिळाला आहे. सुधारकर बडगुजर यांचा आज मुंबई भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश झाला. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरिष महाजन, भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांच्य उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी बडगुजर यांच्यासह बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुर्तडक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.


पक्षप्रेशाच्या कार्यक्रमात बडगुजर म्हणाले की, मी कोवीड काळात काम केले. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीत ‘दुध का दुध पानी का पानी ’ होईल असा टोला ठाकरे गटाला त्यांनी लावला. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे कौतुकही त्यांनी केले. “ दूरदृष्टी असणारा नेता आज मुख्यमंत्रिपदावर आहेत, त्यांच्या नेतृत्वात मी काम करणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे जी जबाबदारी मला देतील ती जबाबदारी मी पार पाडणार आहे, असंही बडगुजर म्हणाले.


बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिक मधील पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला माझा विरोध कायम आहे. काल मी सोशल मिडियावर पोस्ट देखील केले होते. अशा देशद्रोही आणि बंडखोर लोकांबरोबर काम करणे अवघड आहे. आज ते प्रवेश करणार आहेत याबाबत मला काही कल्पना नाही. जे देशद्रोही आहेत, बंडखोर आहेत किंवा ज्यांनी गोळीबार केले आहेत, ते आमच्याच मतदारसंघात आहेत. अशा लोकांबरोबर एकत्र काम कसे करणार?


दरम्यान, बडगुजर यांचे एका हॉटेलमध्ये सलीम कुत्ता सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे सरकारच्या काळात केले होते. ज्यांनी देशद्रोहाचे आरोप केले त्यांनीच सुधाकर बडगुजर यांना पक्षप्रवेश दिल्याची चर्चा नाशिककरांमध्ये रंगल्या आहेत.

Comments


bottom of page