शिरूर कासार मध्ये बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला ; न्यूमोनियामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज,
- Navnath Yewale
- Oct 2
- 1 min read
मृत बिबट्या बछडा हा मादी जातीचा असून पाच ते सहा महिन्यांचा आहे.

शिरूर कासार शहरात जिजामाता चौका पासून हाकेच्या अंतरावर पैठण _पंढरपूर पालखी मार्गाच्या रस्त्याच्या कडेला मानव वस्तीत शुक्रवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला.
ही बाब गेल्या 30 वर्षापासून नित्य नियमाने सकाळी पाच वाजता पैठण _पंढरपूर पालखी मार्गे फिरायला जाणारे प्रसिद्ध लेखक डॉ.विठ्ठल जाधव यांच्या लक्षात आली. डॉ. जाधव यांना सकाळच्या अंधुक प्रकाशामध्ये जाताना हे बिबट्याचे पिल्लू दिसून आले नाही, मात्र दुर्गंधी येत होती. हा वास नेमका कशाचा आहे हे त्यांनी घरी परतताना पाहिले तर त्यांना रस्त्याच्या कडेला मृत बिबट्याचे पिल्लू दिसून आले .
त्या क्षणी त्यांनी ताबडतोब सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे संचालक मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व माहिती दिली. त्यानंतर तात्काळ सिद्धार्थ सोनवणे व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्या बिबट्याच्या मृत बछड्यास ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे शवविच्छेदनासाठी पाठवले.
त्याचे शवविच्छेदन डॉ.देवानंद खाडे व डॉ.सतीश नरोटे यांनी केले.सदर बछड्याचा मृत्यू न्यूमोनियामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
मृत बिबट्या बछडा हा मादी जातीचा असून पाच ते सहा महिन्यांचा आहे.
विभागीय वन अधिकारी अमोल गरकळ , मानद वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे,वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे ,वनपाल अजय देवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जोशी यांनी घटनास्थळी पंचनामा केला.व पशुधन विकास अधिकारी डॉ. देवानंद खाडे व डॉ.सतीश नरोटे यांनी मृत बिबट्याच्या बछड्याचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर सदर मृत बिबट्याचे दहन वन विभागामार्फत करण्यात आले.
" सदरील बिबट्याच्या बछड्याची मृत्यूची घटना ही मानव वस्तीच्या जवळ झालेली तालुक्यातील पहिलीच घटना . या अगोदर अशी घटना तालुक्यात कुठेही घडली नाही. मात्र या घटनेमुळे शिरूर कासार गाव परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे .जेणेकरून या बिबट्याच्या वयाचे आणखीन दोन ते तीन पिल्लं असण्याची शक्यता आहे .त्यामुळे रात्री किंवा सकाळी फिरताना सावधगिरी बाळगावी."
सिद्धार्थ सोनवणे
(मानद वन्यजीव रक्षक,बीड)



Comments