अंधभक्तांच्या विरोधातील लढाईमध्ये देशभक्तांचा विजय, तिरंगा विजय जल्लोष रॅलीत उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
- Navnath Yewale
- 1 hour ago
- 2 min read

मुंबई: धर्मेंद्र प्रधान यांच्या केंद्रीय शिक्षणमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर मुंबईत रविवारी (दि.26) आयोजीत करण्यात आलेल्या तिरंग विजय जल्लोष सभेला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार्या या मार्चसाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात सकाळपासूनच हजारो विद्यार्थी, तरुण आणि समर्थक जमा झाले. हातात तिरंगा घेऊन घोषणाबाजी करत अनेकांनी या विजय रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
तिरंगा विजय जल्लोष सभेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. वसंत देसाई चौक परिसरात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.
यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थितांना अभिवादन करत, नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या 21 परीक्षार्थी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच आंदोलनदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि सातत्यपूर्ण आंदोलनामुळे हा विजय शक्य झाल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले.
मार्चला संबोधीत करताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवार जोरदार हल्लाबोल केला.“ आज कोणत्याही निवडणुकीमध्ये आपला विजय झाला नसला, आपण जिंकलो नसलो तरीही अंधभक्तांच्या विरोधातल्या लढाईमध्ये देशभक्तांचा विजय झालाय. असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच जमलेल्या तरुणाईचेही आभार मानले. “ देशातील जात, पात, धर्म विसरून भारतीय आणि देशभक्त म्हणून आपण एकत्र आलेलो आहोत, यासाठी सगळ्यांचे आभार, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.
राज ठाकरे म्हणाले “ विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने सरकारला झुकवून दाखवले. जेन झी पिढी सरकारला प्रश्न विचारू शकते, हे या आंदोलनाने सिद्ध केले आहे.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनीही तरुणांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले. “ देशातील तरुणांनी हुकूमशाहीला हादरा दिला आहे. ही नव्या भारतातील तरुणाईची ताकद आहे. मंत्री प्रधान ते पंतप्रधान हा प्रवास आता फार दूर नाही. नितीन गडकरी यांच्या इथेनॉल धोरणाबाबत आणि निर्मला सीतारामन यांच्या निर्णयांबाबतही जनतेमध्ये नाराजी आहे. आता ही पिढी प्रत्येक प्रश्नावर सरकारला जाब विचारणार आहे.”
मार्चमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एका विद्यार्थ्याने सांगितले, “ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आम्ही अनेक दिवस आंदोलन केले. अखेर आमच्या आंदोलनालाव यश मिळाले आहे. हा विजय साजरा करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत.”
“ सरकार आमच्या प्रश्नांना उत्तर देत नव्हते, या आंदोलनाने सत्ताधार्यांना जनतेसमोर उत्तर द्यावे लागते, हे दाखवून दिले. यापुढेही आम्ही प्रश्न विचारत राहू.
तिरंगा विजय जल्लोष रॅली दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून सुरू होऊन प्रभादेवीतील सिद्धविनायक मंदिरापर्यंत पोहोचली. समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.



Comments