अजितदादांच्या मृत्यूच्या विषयाबाबत यापूढे कधीही बोलणार नाही- खासदार सुप्रिया सुळे
- Navnath Yewale
- 7 minutes ago
- 2 min read

नागपूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणि त्यांच्या निधनावरून सुुरू असलेल्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी अखेर पडदा टाकण्याचे संकेत दिले आहेत. “ माझी हात जोडून विनंती आहे, मी आजपासून या विषयावर बोलणे बंद केले, ” असे स्पष्ट करत त्यांनी या मुद्यावर आधिक भाष्य करण्यास नकार दिला. अजित पवार यांच्या अपघाताबाबत यापुढे आपण बोलणार नाही. या विषयावर सातत्याने चर्चा होत असून त्यातून अनेक गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, मी आजपासून या विषयावर बोलणे बंद केले असे खासदार सुळे म्हणाल्या.
देशातील शिक्षण व्यवस्थेवर सुप्रिया सुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. विद्यार्थी बारावीचा अभ्यास करायचा की नीट आणि सीईटीची तयारी करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी नेमक्या किती परीक्षा द्यायच्या, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बारावी, नीट आणि सीईटी अशा विविध परीक्षांमध्ये विद्यार्थी आणि पालक नाहक भरडले जात आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांना महागडे शिक्षण परवडार कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आम्ही शिक्षणाचे राजकारण करत नाही. हा विषय अत्यंत गांभीर्याने घेत आहोत, असे त्या म्हणाल्या.
नागपूरात डीजेबाबत नियम आणि कायदे कोटेकोरपणे लागू केले जात असतील, तर तेच नियम संपूर्ण महाराष्ट्रात लागू का केले जात नाहीत, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी या विषयात स्वत: लक्ष घालून नियमांची अंमलबजावणी करावी, सण उत्सव साजरे करण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट करत त्या म्हणाल्या की, सण साजरे झालेच पाहिजेत, कारण ती आपली संस्कृती आहे, मात्र उत्सव कायद्याच्या चौकटीत झाले पाहिजेत. रात्री दहा वाजल्यानंतर डीजे वाजवू नये आणि आवाजाची मर्यादा पाळावी, हा नियम आम्ही केलेला नसून न्यायालय आणि प्रशासनाचा आदेश असल्याचंही त्या म्हणाल्या.
पुण्यातील डीजे मोर्चाबाबत बोलताना त्यांनी वाद टोकाला गेल्याचे सांगितले. आगामी काळात मोठे सण असल्याने सर्व संबंधितांना एकत्र बोलावून समंजसपणे मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते; मात्र पुण्याबाबत सातत्याने चुकीच्या आणि वाईट घटनांच्या बातम्या येत आहेत.
वर्दीची भीती कुणालाच राहिली नाही, याची चिंता वाटते, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी डीजेवर नाचत असल्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. नाचण्याला कोणाचाही विरोध नाही, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि प्रशासनाचे नियम पाळले पाहिजेत. नागपूरात डीजेवर बंदी लागू होऊ शकते, तर संपूर्ण महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नियमांची अंमलबजावणी करावी,असं त्या म्हणाल्या. कुणावर हात उगारण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाही आणि त्याला शांततेच्या मार्गाने उत्तर दिले जाईल.
मनोज जरांगे यांचा आंदोलनाबाबतीत बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मराठा, ओबीसी, आदिवासी तसेच महिलाही विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या ना कोणत्या प्रश्नावर आंदोलन सुरू असल्याचे चित्र आहे. राज्यात 200 आमदारांचे सरकार असूनही आंदोलन कमी होत नाहीत, याचा अर्थ काहीतरी चुकत आहे. सरकारने आत्मचिंतन करून संबंधित घटकांशी संवेदनशीलपणे चर्चा करावी असंही त्या म्हणाल्या.
मराठा आणि ओबीसी समाजातील वाढत्या तेढीला सरकार जबाबदार असल्याचा अरोपही त्यांनी केला. गल्लीपासून दिल्लपर्यंत त्यांचेच सरकार असल्याचे सांगत सरपंचापासून पंतप्रधानांपर्यंत सत्ता त्यांच्याकडे आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार आहे. समाजात तेढ निर्माण होत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी सरकारची आहे अशी टीकाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.



Comments