आकाशात दिसले ‘इंद्रवज्र’; सूर्याभोवतीच्या प्रभामंडळाने वेधले लक्ष

रविवारी १२:३० ते ३ दुपारच्या सुमारास आकाशात सूर्याभोवती निर्माण झालेले विलोभनीय प्रकाशवलय नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. निळ्याशार आकाशात तेजस्वी सूर्याभोवती मोठे गोलाकार प्रभामंडळ दिसत असल्याने हे दृश्य अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरले. निसर्गाच्या या अनोख्या दृश्याचे छायाचित्र निसर्ग अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी आपल्या मोबाईल मध्ये टिपले .
या आकाशीय प्रकाशीय घटनेला पारंपरिक भाषेत ‘इंद्रवज्र’ असे संबोधले जाते, तर विज्ञानाच्या भाषेत याला ‘सोलर हॅलो’ (Solar Halo) किंवा ‘२२ अंशांचे सूर्यप्रभामंडळ’ (22° Halo) असे म्हणतात.
बर्फाच्या स्फटिकांमुळे निर्माण होते प्रभामंडळ सूर्याभोवती दिसणारे हे वलय प्रत्यक्षात सूर्याभोवती असलेले कोणतेही भौतिक वर्तुळ नसते. वातावरणाच्या अतिउंच थरांमध्ये असलेल्या सूक्ष्म षट्कोनी बर्फाच्या स्फटिकांमधून सूर्यप्रकाश जाताना त्याचे अपवर्तन (Refraction) आणि परावर्तन होते. या प्रक्रियेमुळे सूर्याच्या भोवती प्रकाशाचे वलय निर्माण झाल्यासारखे दिसते.
साधारणपणे हे प्रभामंडळ सूर्यापासून सुमारे २२ अंशांच्या कोनावर तयार होते. त्यामुळे त्याला ‘२२° हॅलो’ असेही म्हटले जाते. वातावरणातील बर्फाचे स्फटिक सूर्यप्रकाशाला विशिष्ट कोनातून वाकवतात आणि त्यातून तयार झालेला प्रकाश आपल्या डोळ्यांना गोलाकार वलयाच्या स्वरूपात दिसतो.
हवामानाशी संबंधित नैसर्गिक संकेत
अशा प्रकारचे सूर्यप्रभामंडळ प्रामुख्याने उंच आकाशात असलेल्या सिरस (Cirrus) आणि सिरोस्ट्रेटस (Cirrostratus) ढगांमध्ये दिसते. या ढगांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असतात. त्यामुळे प्रभामंडळ दिसणे ही वातावरणातील वरच्या थरांमध्ये बर्फाचे स्फटिक अस्तित्वात असल्याची खूण असते.
‘इंद्रवज्र’ म्हणून ओळखले जाणारे हे दृश्य कोणताही चमत्कार नसून प्रकाशाचे वातावरणातील बर्फाच्या स्फटिकांशी होणारे अपवर्तन व परावर्तन प्रक्रियेतून निर्माण होणारी सुंदर वैज्ञानिक घटना होय असे मत निसर्गअभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी व्यक्त केले आहे. निसर्गाच्या सौंदर्याबरोबरच त्यामागील विज्ञानाची अनुभूती देणारे हे दृश्य नागरिकांसाठी आकर्षण ठरले.



Comments